हल्लेखोराने चौघांना धरले वेठीस, यशस्वी सुटका
टेक्सास / वृत्तसंस्था
अमेरिकेतील टेक्सास येथे ‘सिनेगॉग’ या ज्यूंच्या धार्मिक स्थळावर रविवारी हल्ला करण्यात आला. बंदुकधारी हल्लेखोराने चार जणांना ओलीस ठेवले होते. मात्र, सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे ओलिसांची सुटका करण्यात आली. दरम्यान, हल्लेखोर व्यक्तीने पाकिस्तानी शास्त्रज्ञ आफिया सिद्दिकीच्या सुटकेची मागणी केली होती. आफिया सध्या टेक्सासच्या फेडरल कारागृहामध्ये बंदिस्त आहे. तिच्यावर अफगाणिस्तानच्या ताब्यात असताना अमेरिकन लष्करी अधिकाऱयांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. हल्लेखोर म्हणजे ओलीस ठेवणारी व्यक्ती स्वतःला आफिया सिद्दिकीचा भाऊ असल्याचे सांगत होती. मात्र, आफियाच्या भावाने प्रसारमाध्यमांसमोर येत आपला या हल्ल्यात समावेश नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर हा हल्ला दहशतवादी असल्याचा संशय गडद झाला. याप्रकरणी अमेरिकन सुरक्षा यंत्रणांकडून अधिक चौकशी सुरू आहे.









