कोरोना वाढत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाला केराची टोपली
संगमेश्वर/प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता शिरकाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले असताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत संगमेश्वर आठवडा बाजारात खरेदीसाठी गर्दी उसळली आहे. गर्दी पाहून कोरोना पळाला की काय अशी शंका पहाणाऱ्याला मिळत आहे.
देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यात सर्वत्र कडक निर्बंध लागू केले आहेत. यासाठी राज्यसरकारने सर्व जिल्ह्यांसाठी नियमावली जारी केली आहे. जिल्ह्यांमध्ये दिवस जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी लागू आहे. पण काही ठिकाणी कोरोना नियम धाब्यावर बसवले जात आहेत. रत्नागिरीतील संगमेश्वर बाजारपेठेत हे चित्र पहायला मिळाले. कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही नागरिक गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. आज संगमेश्वर बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. जिल्हा प्रशासनाने आदेश काढूनही नागरिक या आदेशांना केराची टोपली दाखवत आहेत.