अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार 12 जानेवारी 2022, सकाळी 11.00
सौम्य लक्षणांमुळे 82.8 टक्के रूग्ण गृहविलगीकरणात
● जिल्ह्यात 1434 रूग्ण गृहविलगीकरणात
● फक्त 144 रूग्ण रूग्णालयात
● गत दहा दिवसातील स्थिती
● सातारा, कराड वगळता इतर तालुक्यात अल्प वाढ
● 24 तासात वाढले 735 रूग्ण
● पॉझिटिव्हीटी रेट 16.12 वर
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात जानेवारी महिन्याचा दुसरा आठवडाही कोरोना रूग्णवाढीचा आलेख वाढवणारा ठरत आहे. रूग्णवाढ होत असली तरी रूग्णांमधे सौम्य लक्षणे असून अपवाद वगळता रूग्णालयात भरती होण्याची शक्यता मंदावली आहे. जि्ल्हा आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार 31 डिसेंबर ते 9 जानेवारीपर्यंत फक्त 144 रूग्णांनी रूग्णालयात उपचार घेतले. या दहा दिवसात बाधित आलेल्या एकूण 1731 रूग्णांपैकी 82.8 टक्के रूग्ण हे सौम्य लक्षणे असल्याने गृहविलिगीकरणात आहेत. त्यापैकी बरेचजण अगदी ठणठणीत आहेत. त्यामुळे रूग्णवाढ होत असली तरी जिल्ह्यातील कोरोना स्थिती आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवाय गृहविलीगरणातील रूग्णांच्या ‘डेली अपडेट’ आरोग्य विभागाकडून घेतल्या जात आहेत. दरम्यान बुधवारी सकाळी आलेल्या अहवालात जिल्ह्यात नव्याने 735 रूग्ण वाढले असून पॉझिटिव्हीटी रेट 16.12 वर पोहचला आहे.
सातारा, कराडात सर्वाधिक गृहविलगीकरणात
जिल्ह्यात सातारा तालुक्यात 481 रूग्णांपैकी 404 रूग्ण गृहविलगिकरणात आहेत. फलटण तालुक्यात 162 रूग्ण असून 125 गृहविलगिकरणात आहेत. खटाव तालुक्यात 69 रूग्णांपैकी 58 रूग्ण गृहविलगिकरणात आहेत. कराड तालुक्यात 313 रूग्ण असून 292 गृहविलगिकरणात आहेत. माण तालुक्यात 50 रूग्णांपैकी 30 रूग्ण गृहविलगिकरणात आहेत. कोरेगांव तालुक्यात 60 रूग्णांपैकी 46 रूग्ण, पाटण 84 रूग्णांपैकी 52, वाई 136 पैकी 109, महाबळेश्वर 156 पैकी 136, खंडाळा 106 पैकी 74, जावली 107 रूग्णांपैकी 106 रूग्ण गृहविलगिकरणात आहेत. इतर 7 पैकी 2 रूग्ण गृहविलगीकरणात आहेत. म्हणजे दहा दिवसात 1731 रूग्णांपैकी 1434 रूग्ण हे सौम्य लक्षणांमुळे गृहविलगीकरणात आहे.
काळजी घेतल्यास गृहविलगीकरणातच ठणठणीत
कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यावर योग्य ती खबरदारी व वैद्यकीय सल्ला वेळेत घेतल्यास रूग्णांना हॉस्पीटलमध्ये जाण्याची वेळ येत नाही. सध्या उपचारार्थ असलेल्या रूग्णांपैकी 82.8 टक्के रूग्ण हे गृहविलगीकरणात आहेत. अपवादात्मक रूग्णांनाच रूग्णालयात भरती करावे लागत आहे. त्यातही ऑक्सीजन किंवा व्हेंटिलेटरवर जाण्याची शक्यताही कमी असल्याचा दावा होत आहे. मात्र तरीही नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करण्याची आवश्यकता आहे. निर्बंधांचे पालन करणे गरजेचे आहेत.
लसीकरणाचे सकारात्मक परिणाम
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जिल्हा भरडला गेला. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यातच लसीकरणाला सुरूवात झाली. आता लसीकरणाने महत्त्वाचा टप्पा पुर्ण केला आहे. सातारा जिल्ह्यातही लसीकरणाचा वेग लक्षवेधी वाढला आहे. त्यामुळे तिसरया लाटेत त्याचा फायदा होत असावा अशी शक्यता वैद्यकीय तज्ञांकडून वर्तवली जात आहे. रूग्णवाढ होत असली तरी अपवाद वगळता रूग्णांच्यात सौम्य लक्षणे आढळत आहे.
जिल्ह्यात मंगळवारी
नमुने-4559
बाधित-735
मृत्यू-1
मुक्त-116
उपचारार्थ-1571
मंगळवारपर्यंत जिल्ह्यात
नमुने-24,08,489
बाधित-2,54,738
मृत्यू-6503
मुक्त-2,45,441









