
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित एसपी घाळी चषक सोळा वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत आज खेळविण्यात आलेल्या सामन्यात ग्लॅडिएटर्सने एमसीसी संघाचा 105 धावानी तर रायकर वॉरियर्सने स्पार्टन संघाचा 7 गडय़ांनी पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळविले. कवीश मुकण्णावर (ग्लॅडिएटर्स), साईराज साळुंखे (रायकर वॉरियर्स) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर मंगळवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ग्लॅडिएटर्स संघाने 23 षटकात 5 बाद 187 धावा केल्या स्पर्धेतील पहिले शतक झळकावताना कवीश मुकण्णावरने 63 चेंडूत 18 चौकारांसह 113 धावांची शतकी खेळी साकारली. उबेदउल्लाने 32 तर भुवनने 18 धावा केल्या, एमसीसीसीतर्फे कृष्णा मेणसेने 4 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल एमसीसीसीचा डाव 22.2 षटकात 82 धावात आटोपला. सोहन कल्लूरने 32 तर चिन्मयने 16 धावा केला. ग्लॅडिएटर्सतर्फे मदन चडीचाल, गौरव काटने व ओवीज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात स्पार्टन संघाने प्रथम फलंदाजी करताना 23 षटकांत 8 बाद 115 धावा केल्या. सुजल काकतकर 19, अद्वैत साठे 16 धावा केल्या. रायकर वॉरियर्सतर्फे वैष्णव यळगुकरने तीन तर अभिषेक निकमने दोन गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल रायकर वॉरियर्स संघाने 21 षटकात 3 बाद 116 धावा करून सामना 7 गडय़ानी जिंकला. उत्कर्ष शिंदेने 7 चौकार, 1 षटकारासह 42, साईराज साळुंखेने 37 धावा केल्या. स्पार्टनतर्फे समर्थ दुबे व अमोग बदामी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
सामन्यानंतर सामनावीर कवीश मुकण्णावर व इम्पॅक्ट खेळाडू कृष्णा मेणसे यांना प्रमुख पाहुणे अमर सरदेसाई, चंद्रकांत कडोलकर व सचिन साळुंखे यांच्या हस्ते तर दुसऱया सामन्यातील सामनावीर साईराज साळुंखे व इम्पॅक्ट खेळाडू वैष्णव यळगुकर यांना प्रमुख पाहुणे मंगला रायकर, पूजा रायकर, संजना पावस्कर यांच्या हस्ते चषक देवून गौरविण्यात आले.









