आरोग्य केंद्रनिहाय तपशील जाहीर करणे का बंद? : राज्यभरातील 8154 नमुन्यांपैकी 2476 बाधित.महाराष्ट्र, कर्नाटकात कडक निर्बंध, गोवा बिनधास्त
प्रतिनिधी /पणजी
गोव्यात आता कोरोनाचा उद्रेक झाल्याचे समोर आले असून गेल्या 24 तासात म्हणजे मंगळवारी 2476 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर 4 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 3537 वर पोहोचला आहे. सक्रिय कोरोना रुग्णसंख्येने 12 हजार पल्ला गाठला असून तो आकडा 12019 वर पोहोचला आहे. कोरोना संसर्गाचा दर वाढून 30.36 टक्के एवढा झाला आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून गोव्याच्या सीमांवर मात्र कोणतीच बंधने नसल्यामुळे इतर राज्यातील लोक, पर्यटक बिनबोभाटपणे गोव्यात प्रवेश करीत असून आता तरी राज्य सरकारने जागे होण्याची वेळ आली आहे. राज्यातील आरोग्य केंद्रनिहाय कोरोना रुग्ण आकडेवारीचा तपशील देण्याचे आरोग्य खात्याने बंद केल्यामुळे कुठे रुग्ण वाढले हे कळण्याचा मार्ग बंद झाला आहे. शिवाय हा तपशील का लपवण्यात येत आहे? असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे.
राज्यभरातील 8154 नमुन्यांपैकी 2476 बाधित
दिवसभरात 27 जणांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असून 15 जणांना तेथून घरी पाठवण्यात आले आहे. दिवसभरात 592 जण कोरोनातून बरे झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे. गेल्या 24 तासात 8154 जणांचे नमूने तपासण्यात आले आणि त्यातील 2476 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह मिळाला आहे. त्यातील 2449 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले असून बरे होण्याचा दर 91.98 टक्के असल्याचे दिसून आले आहे.
आतापर्यंत मिळून एकूण 193977 जणांना या कोरोनाची लागण झाली असून त्यातील 178429 जणांना कोरोनातून मुक्ती मिळाली आहे. कोरोनाचे रुग्ण गोव्यात सर्व ठिकाणी वाढत असून पणजी, मडगांव ही दोन शहरे आधीपासूनच ‘हॉटस्पॉट’ बनली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शेजारील राज्यात निर्बंध, गोवा बिनधास्त
शेजारील महाराष्ट्र, कर्नाटक या दोन्ही राज्यांतील कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे तेथे कडक निर्बंध लागू करण्यात आले असून त्याच्या तुलनेत गोव्यात काहीच निर्बंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गोव्यात सर्व काही बिनधास्त चालू असून त्याचेच परिणाम म्हणून कोरोना वाढत असल्याचे समोर येत आहे.
आरटीपीसीआर, अँटीजेन चाचणीचे दर निश्चित
कोरोनाची चाचणी करण्यासाठी राज्य सरकारने दर निश्चित केले असून आरटीपीसीआर चाचणी रु. 500 तर अँटीजेन चाचणी रु. 250 एवढे शुल्क आकारण्यात यावे, असे सूचित केले आहे. सदर आशयाची अधिसूचना आरोग्य खात्याने जारी केली असून खासगी इस्पितळे, लॅब यांनी त्याचे पालन करावे यासाठी ही अधिसूचना काढण्यात आली आहे. कोरोना चाचणीसाठी खासगी लॅब, इस्पितळे वाटेल तसे शुल्क घेत असल्याची तक्रार आल्याने त्याची गंभीर दखल घऊन आरोग्य खात्याने सदर शुल्क मर्यादा निश्चित केली आहे.









