न्यूझीलंड बांगलादेशविरुद्ध दुसऱया कसोटीत डावाने विजयी
ख्राईस्टचर्च / वृत्तसंस्था
रॉस टेलरने कसोटी कारकिर्दीतील आपला तिसरा बळी घेतल्यानंतर न्यूझीलंडने बांगलादेशविरुद्ध दुसरी व शेवटची कसोटी डावाने जिंकली आणि 2 सामन्यांची ही मालिका 1-1 अशा फरकाने बरोबरीत राखली. द्विशतक झळकावणारा टॉम लॅथम सामनावीर तर डेव्हॉन कॉनवे मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
या लढतीत न्यूझीलंडने पहिला डाव 6 बाद 521 वर घोषित केल्यानंतर बांगलादेशचा पहिला डाव 126 धावांवर आटोपला तर दुसऱया डावातही त्यांना सर्वबाद 278 धावांवर गाशा गुंडाळावा लागला. न्यूझीलंडचा संघ या लढतीत एक डाव व 117 धावांनी विजयी ठरला. यजमान संघातर्फे काईल जेमिसनने 82 धावात 4 तर नील वॅग्नरने 77 धावात 3 बळी घेतले. साऊदी, मिशेल व रॉस टेलर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
फॉलोऑननंतर बांगलादेशने दुसऱया डावाला सावध सुरुवात केली. मात्र, काईल जेमिसन व नील वॅग्नर यांनी बांगलादेशच्या फलंदाजी लाईनअपला मोठा सुरुंग लावला. बांगलादेश संघातर्फे लिटॉन दासने (102) एकाकी झुंज दिली. या विजयासह न्यूझीलंडने मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. शिवाय, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील मोहिमेत 12 महत्त्वपूर्ण गुणांची कमाई केली.
2006 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा रॉस टेलर न्यूझीलंडसाठी सातत्याने फलंदाजीतील भक्कम आधारस्तंभ ठरत आला असून किवीज संघातर्फे सर्वाधिक धावा (18074) व सर्वाधिक प्रतिनिधीत्व (445) करण्याच्या निकषावर तो अव्वलस्थानी राहिला आहे.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड पहिला डाव ः 6 बाद 521 वर घोषित. बांगलादेश पहिला डाव सर्वबाद 126 व दुसरा डाव सर्वबाद 278 (लिटॉन दास 114 चेंडूत 14 चौकार, 1 षटकारासह 102, मोमिनूल हक 63 चेंडूत 37, नजमूल होसेन 29. काईल जेमिसन 4-82, नील वॅग्नर 3-77, डॅरेल मिशेल, साऊदी, रॉस टेलर प्रत्येकी 1 बळी).

शेवटचा बळी घेऊन विजयासह सांगता करणे सन्मानाचे ः रॉस टेलर
गोलंदाजीच्या आघाडीवर शेवटचा बळी घेऊन विजयासह कसोटी कारकिर्दीचा समारोप करणे माझ्यासाठी विशेष सन्मानाचे आहे, असे रॉस टेलर या लढतीनंतर म्हणाला. रॉस टेलरने बांगलादेशचा शेवटचा फलंदाज इबादत हुसेनला बाद केले आणि येथेच न्यूझीलंडच्या डावाने विजयावर शिक्कामोर्तब झाले.
‘बांगलादेश संघाने आमच्यावर बरेच दडपण राखले. मात्र, पहिल्या डावात धावांचा डोंगर रचता आला, त्यामुळे आम्ही वर्चस्व गाजवत ही मालिका बरोबरीत राखू शकलो. बुधवारी पुन्हा मैदानात उतरावे लागेल का, याचा मी विचार करत होतो. पण, आमच्या गोलंदाजांनी लक्षवेधी मारा केला’, असे रॉस टेलरने पुढे सांगितले.

किवीज जलद गोलंदाज काईल जेमिसनला मानधन कपातीचा दंड
न्यूझीलंडचा जलद गोलंदाज काईल जेमिसनला शिस्तभंग केल्याबद्दल 15 टक्के मानधन कपातीचा दंड ठोठावण्यात आला. बांगलादेशच्या डावातील 41 व्या षटकात जेमिसनने यासीर अलीला बाद केल्यानंतर आक्षेपार्ह शब्द वापरले होते. सामन्यानंतर त्याने आपली चूक कबूल केली आणि यामुळे स्वतंत्र सुनावणी घेण्याची आवश्यकता बाकी राहिली नाही.
जेमिसनने मागील 2 वर्षांच्या कालावधीत शिस्तभंग केल्याची ही तिसरी वेळ असून यामुळे एका गुणाचा दंड ठोठावण्यात आला. जेमिसनने यापूर्वी 28 डिसेंबर 2020 रोजी पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात व 23 मार्च 2021 रोजी बांगलादेशविरुद्ध ख्राईस्टचर्च वनडे लढतीत असे आक्षेपार्ह वर्तन केले होते.









