कचेरी चौक-यल्लामा चौक रस्त्यावरील विक्रेत्यांचे केले नियोजन
प्रतिनिधी / इस्लामपूर
नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमणे हटाव मोहिमेअंतर्गत मंगळवारी दुसऱ्या दिवशी मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी यल्लामा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील हातगाड्यांचे नियोजन केले. तर सोमवारी जप्त केलेल्या साहित्याचे वर्गीकरण केले.
सोमवारपासून पालिका प्रशासनाने शहरातील स्थायी व अस्थायी स्वरूपाची अतिक्रमणे हटवण्याची धडक मोहीम सुरु केली. त्यामुळे अनेक चौकातील डिजिटल फलक, हातगाडी, बांधकाम साहित्य हटवले. तर सुमारे दोनशे जणांना नोटीस देण्यात आली आहे. तर जप्त साहित्याचे वर्गीकरण करण्यात आले. त्याचा लवकरच लिलाव करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी साबळे सांगितले.
मंगळवारी मुख्याधिकारी साबळे यांनी रस्त्यावर उतरत कचेरी चौक ते यल्लामा चौक येथील रिक्षा स्टँड आणि फळ विक्रेते,किरकोळ विक्रेते यांचे नियोजन लावले. रस्त्याच्या दोन्ही टोकांना १०-१० रिक्षा लावण्याची सोय आणि जागा करून देण्यात आली. एकाच व्यक्तीचे दोन – तीन हातगाडे किंवा विक्रीच्या जागा आढळून आल्या, त्यांना योग्य सूचना देऊन हटवण्यात आले व त्या जागी इतर गरजूंना जागा देण्यात आली. येत्या २ दिवसात उरलेल्या भागात देखील अतिक्रमण आणि विद्रुपीकरण विरोधी मोहीम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती साबळे यांनी दिली.








