15 जानेवारीनंतर बसप उमेदवारांची पहिली यादी
वृत्तसंस्था/ लखनौ
बसप अध्यक्षा मायावती आणि पक्षाचे सरचिटणीस सतीश चंद्र मिश्र हे उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक लढविणार नाहीत. तसेही सतीश चंद्र यांनी यापूर्वीही कधी निवडणूक लढविली नव्हती. सतीश चंद्र यांना पक्षाच्या व्यवस्थापनासाठी ओळखले जात असल्याचे काही नेत्यांकडून सांगण्यात आले.
राज्यसभेचा खासदार असून अनेक राज्यांमध्ये निवडणूक होत आहे. मायावती यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी असल्याचे सतीशचंद्र यांनी म्हटले आहे. माझे पुत्र कपिल मिश्र तसेच मायावतींचे भाचे आकाश आनंद हे देखील निवडणूक लढविणार नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
मोठय़ा विजयाचा दावा
बहुजन समाज पक्ष राज्यातील सर्व 403 जागांवर निवडणूक लढविणार आहे. कुठल्याही अन्य पक्षासोबत आघाडी केली जाणार नाही. 2007 प्रमाणेच यंदाही सत्ता प्राप्त झाल्यास सर्व घटकांची काळजी घेतली जाणार असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे. मायावती यांनी अलिकडेच अतिमागास वर्ग, मुस्लीम आणि जाट समुदायाच्या पक्षनेत्यांसोबत लखनौमध्ये बैठक घेतली आहे.
323 नावे निश्चित
उत्तरप्रदेश निवडणुकीकरता बसपच्या 323 उमेदवारांची नावे ठरली आहेत. आता 80 उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत. 3 दिवसांमध्ये सर्व उमेदवारांची नावे निश्चित होणार आहेत. उमेदवारांची पहिली यादी 15 जानेवारीनंतर घोषित केली जाणार आहे.
दिग्गज नेते पक्षाबाहेर
बसप संस्थापक काशीराम यांच्या काळात पक्षाशी जोडले गेलेले बहुतांश प्रमुख नेते आता पक्षाबाहेर पडले आहेत. माजी मंत्री नसीमुद्दीन सिद्दीकी, राज बहादुर, आर.के. चौधरी, दीनानाथ भास्कर, मसूद अहमद, बरखूराम वर्मा, दद्दू प्रसाद, जंगबहादुर पटेल आणि सोनेलाल पटेल या नेत्यांच्या यात समावेश होता. परंतु पक्षात मायावतींचे वर्चस्व वाढू लागताच अनेक नेते पक्षाबाहेर पडले.









