ऑनलाईन टीम / मुंबई :
उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे माजी नेते सिराज मेहंदी यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी बोलताना भाजपचे 13 आमदार आणि ज्येष्ठ नेते पक्ष सोडतील, असा दावा शरद पवार यांनी केला.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा समजावादी पक्ष आणि इतर लहान पक्षांसोबत मिळून उत्तर प्रदेशची निवडणूक लढवणार आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक दिग्गज नेता अशी ओळख असलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रिपद आणि पक्षाचा त्याग करत आज समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. ही सुरूवात आहे. आता उत्तरप्रदेशची जनता भाजपला कंटाळली आहे. त्यांना बदल हवा आहे. येत्या काळात उत्तरप्रदेशातील भाजपचे 13 आमदार आणि ज्येष्ठ नेते पक्ष बदलतील. आगामी काळात मी उत्तरप्रदेशात प्रचारासाठी जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले.