पाचगणी / प्रतिनिधी :
पाचगणी येथे मोठ्या घमासानांत झालेल्या गिरीष गाढवे चषक क्रिकेट स्पर्धेत साताऱ्याच्या आरसी अकॅडमीने विजेतेपद खेचून आणले. या स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी बजावणाऱ्या साताऱ्याच्या अद्वैत प्रभावळकर याला ‘मॅन ऑफ सिरीज’ हा किताब बहाल करण्यात आला.
गेली काही दिवस या स्पर्धा मोठ्या जोशात सुरू होत्या. सेमी फायनलमध्ये पुण्याचे आव्हान संपुष्टात आल्यावर अंतिम सामना आरसी विरुद्ध सदर बझार यांच्यात झाला. यामध्ये प्रथम फलंदाजी करताना आरसी ने 225 धावा केल्या. अनिकेत पवार याने 107 धावा केल्या तर अद्वैत प्रभावळकर ने चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करताना 51 धावा केल्या. त्याच्या उत्तुंग षटकारानी प्रेक्षकांचे लक्ष वेधले. सदर बझारकडून आदित्य देशमुख याने 3 तर ओम कोळी 1 विकेट घेतली.
मोठे आव्हान घेऊन उतरलेल्या संघाला हे आव्हान जड गेले यांच्याकडून चंदन मुनी संदीप या एकट्याने मोठी म्हणजे 29 इतकी धावसंख्या उभारली. त्यांचे आव्हान केवळ 89 धावांत संपले. साताऱ्याकडून खेळणाऱ्या प्रेम बावळेकर याने 4 विकेट घेत विरोधी संघाचे कंबरडे मोडले तर अद्वैत प्रभावळकर याने केवळ 2 रन देत 2 विकेट घेताना त्यांची शेपटी गुंडाळली.
साताऱ्याला चषक बहाल करताना अद्वैत प्रभावळकर याला स्पर्धेचा मॅन ऑफ सिरीज किताब बहाल करण्यात आला तर मॅन ऑफ मॅच अनिकेत पवार आणि बेस्ट बॉलर म्हणून प्रेम बावळेकर याला सन्मानित करण्यात आले.









