विकेंड कर्फ्यूच्या दुसऱया दिवशी प्रवाशांची पाठ : महसूल बुडाला
प्रतिनिधी /बेळगाव
विकेंड कर्फ्यूमुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. याला परिवहन मंडळदेखील अपवाद नाही. शनिवार आणि रविवारच्या विकेंड कर्फ्यूच्या काळात बससेवा सुरू ठेवण्याचा निर्णय परिवहनने घेतला असला तरी प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी परिवहनच्या पदरात दोन दिवस निराशा आली आहे. काही ठिकाणी किरकोळ बसफेऱया वगळता बससेवा प्रवाशांअभावी ठप्प झालेली पहायला मिळाली. त्यामुळे परिवहनला दोन दिवसाच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.
मध्यवर्ती बसस्थानकात उचगाव, वडगाव, अनगोळ, सुळेभावी, होनगा, बस्तवाड, मजगाव, मण्णीकेरी, धामणे, राजगोळी, मुचंडी, कुदेमणी, सावगाव, हंदीगन्नूर, होनगा, काकती, केदनूर यासह लांब पल्ल्याच्या बागलकोट, हुबळी, चिकोडी, धारवाड, अथणी, दावणगेरी, हुक्केरी, बैलहोंगल, सौंदत्ती गोकाक, बीडी आदी बस थांबलेल्या पहायला मिळाल्या. विविध मार्गावर बससेवा सुरू ठेवणार असल्याचे परिवहनकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार बस उपलब्ध करण्यात आल्या होत्या. मात्र प्रवाशांची संख्या अगदी नगण्य असल्याने सर्रास बस थांबून होत्या. तसेच बसचालक व बसवाहकदेखील प्रवाशांच्या प्रतीक्षेत होते. सकाळच्या सत्रात काही स्थानिक आणि लांब पल्ल्याच्या बस धावल्या. मात्र या बसमध्येदेखील प्रवाशांची संख्या कमी होती. दुपारनंतर तर प्रवाशांअभावी सर्व बस आगारात थांबून होत्या.
कोरोनामुळे दोन वर्षांत परिवहनला मोठा फटका बसला आहे. आर्थिकदृष्टय़ा परिवहन अडचणीत सापडले आहे. मागील सहा महिन्यांपासून परिवहनची बससेवा पूर्ववत झाली होती. त्यामुळे महसूल ही काही प्रमाणात जमा होत होता. मात्र आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने शनिवार आणि रविवार या दोन दिवसांच्या महसुलापासून परिवहनला दूर रहावे लागले आहे. विकेंड कर्फ्यूत शाळा महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयांना सुटी देण्यात आली आहे. त्याबरोबरच सर्व रस्त्यावर बॅरिकेड्स लावून मर्यादा घातल्या आहेत. त्यामुळे बाहेर पडणाऱया प्रवाशांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे शनिवार, रविवार प्रवाशांच्या संख्येत मोठी घट झाली. त्यामुळे या दोन दिवसांच्या विकेंड कर्फ्यूचा परिवहनला चांगला तोटा सहन करावा लागला.
आज बससेवा सुरळीत
विकेंड कर्फ्यूमुळे दोन दिवस प्रवाशांअभावी विस्कळीत झालेली बससेवा सोमवारपासून पूर्ववत होणार आहे. सोमवारी सकाळपासून सर्व प्रकारची बससेवा विविध मार्गावर धावणार आहेत. सोमवारी सकाळी विकेंड कर्फ्यूचा कालावधी संपल्यानंतर बाजारपेठ आणि शाळांना प्रारंभ होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. त्यामुळे बससेवाही पूर्ववतपणे विविध मार्गावर धावणार आहेत.









