पाणीपुरवठा मंडळाची डोळेझाक : तातडीने गळती काढण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
एकीकडे पाण्याचा साठा कमी आहे म्हणून आठ ते दहा दिवसांमधून पाणी पुरवठा होतो. पण दुसरीकडे मात्र दररोज हजारो लिटर पाणी वाया जाऊनही त्याकडे डोळेझाक करण्याचा प्रयत्न पाणीपुरवठा मंडळाकडून करण्यात येत आहे. आदर्शनगर, वडगाव येथे मागील पंधरा दिवसांपासून पाण्याची गळती होत असून त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱया नागरिकांना नाहक त्रास होत आहे.
आदर्शनगर येथे वरचेवर पाण्याची गळती होत असते. पूर्णपणे गळती न काढताच घिसाडघाईने स्मार्टसिटी अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले होते. काम पूर्ण झाले खरे. परंतु त्यानंतर अनेकवेळा या ठिकाणी पाण्याची गळती होत आहे. मध्यंतरी कॉंक्रिटीकरण फोडून गळती काढण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पाण्याला गळती लागली आहे. परिणामी दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाणी उतारावरून वाहत असल्याने संपूर्ण परिसरात ओल होत आहे. या मार्गाने वाहने भरधाव जात असल्याने रस्त्यावरील पाणी नागरिकांवर उडत आहे. यामुळे या ठिकाणची गळती तातडीने काढण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.









