अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी 402 कर्मचारी पॉझिटिव्ह : नवे निर्बंध लागू, काहींना ‘वर्क फ्रॉम होम’
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जानेवारीअखेरीस सुरू होणाऱया संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी दिल्लीस्थित संसद भवनात कोरोनाचा स्फोट झाला आहे. संसद भवनात काम करणाऱया 402 कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. 4 ते 8 जानेवारीला संसद भवनात काम करणाऱया कर्मचाऱयांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये जवळपास 402 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. सर्व बाधितांचे नमुने प्रकारांची चाचणी घेण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच पूर्वतयारी सुरू झाली आहे. त्यानुसार गेल्या चार-पाच दिवसात कर्मचाऱयांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यानुसार मागील आठवडय़ात एकूण 1,409 कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱयांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 402 अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये लोकसभेचे 200, राज्यसभेचे 69 आणि संसदेच्या 133 कर्मचाऱयांचा समावेश आहे. राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी नुकताच परिस्थितीचा आढावा घेतला. जानेवारीअखेर सुरू होणाऱया अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
राज्यसभा सचिवालयातही निर्बंध लागू
संसद भवनातील 402 कर्मचाऱयांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर राज्यसभा सचिवालयाने कार्यालयात येणाऱया कर्मचाऱयांवर निर्बंध लादले आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार, अवर सचिव आणि कार्यकारी अधिकाऱयांच्या दर्जाच्या खाली असलेल्या 50 टक्के अधिकारी आणि कर्मचाऱयांना 31 जानेवारीपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ देण्यात आले आहे. तसेच सर्व अधिकृत बैठका व्हर्च्युअल पद्धतीने घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
दिल्लीत दैनंदिन बाधित 20 हजारांवर
दिल्लीत शनिवारी 20 हजार 181 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासह 11 हजार 869 रुग्ण बरे झाले असून 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या दिल्लीतील सकारात्मकता दर दोन टक्क्मयांनी वाढून 19.6 वर पोहोचला आहे. दिल्लीत सध्या कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी विकेन्ड कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच सम-विषम तत्त्वावर दुकाने सुरू ठेवली जात आहेत. मात्र, संसर्ग वाढत असल्याने निर्बंध वाढविण्याचा विचार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चालवला आहे.









