नागठाणे / प्रतिनिधी :
ग्वाल्हेर-बेंगळूर आशियायी महामार्गावर वळसे (ता.सातारा) येथे दुचाकीला झालेल्या अपघातात दुचाकीचालक जागीच ठार झाला. तर पाठीमागे बसलेला एकजण गंभीर जखमी झाला. रविवारी सकाळी हा अपघात झाला. ऋषिकेश चंद्रकांत गोळे (वय.२१,रा.हिल रेंज माध्यमिक विद्यालय,भिलार, महाबळेश्वर, जि.सातारा) असे मृत युवकाचे नाव असून अविनाश दिलीप गोळे (रा .करहर,ता.जावली) असे जखमीचे नाव आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास वळसे येथील अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीसमोर कराड बाजूकडे जाणाऱ्या महामार्गावर होंडा शाईन या दुचाकीला भीषण अपघात झाला.नेमका अपघात कसा झाला याची माहिती मिळू शकली नाही. यामध्ये दुचाकीचालक ऋषिकेश चंद्रकांत गोळे यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.तर पाठीमागे बसलेला अविनाश दिलीप गोळे हा गंभीर जखमी झाला.जखमी युवकास ग्रामस्थांनी तात्काळ उपचारासाठी सातारा येथे पाठविले.घटनास्थळी बोरगाव पोलीस व कराड महामार्ग पोलीस यांनी धाव घेतली.
अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.अपघाताची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय देसाई व हवालदार प्रकाश वाघ करत आहेत.









