प्रतिनिधी/ फोंडा
माजी मुख्यमंत्री व फोंडय़ाचे माजी आमदार रवी नाईक यांची मडकई मतदार संघात शुक्रवारी ‘चाय पे’ चर्चा रंगली. रवी नाईक यांनी हल्लीच भाजपात प्रवेश केला असून मडकईतील भाजपा कार्यर्त्यांसह रामनाथ, उंडिर, आडपई, दुर्भाट व तळावली या गावातील चहाच्या हॉटलेवर बसून मडकईतील विविध प्रश्नांवर चर्चा केली.
आपण सन 1989 ते 1994 या काळात मडकईचा आमदार व याच काळात मुख्यमंत्री होतो. या पाच वर्षांत मडकई मतदार संघात आपण जी विकासकामे राबविली, त्यानंतर याठिकाणी कुठलाच विकास दिसला नाही, असे रवी नाईक प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. मडकई इस्पितळ, औद्योगिक वसाहत, प्रत्येक ग्रामपंचात क्षेत्रात सामाजिक सभागृह, अंतर्गत रस्त्यांची सुधारणा अशी अनेक विकासकामे आपल्या कार्यकाळात झाली. आज उच्च शिक्षणापासून आरोग्यासंबंधी कुठल्याच सुविधा या भागात दिसत नाहीत. रस्त्यांचे रुंदीकरणही झालेले नाही. यावेळी त्यांच्यासोबत मडकई भाजपा मंडळाचे अध्यक्ष प्रदीप शेट, उपाध्यक्ष सागर मुळवी, सुदेश भिंगी, जयराज नाईक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
काही महिन्यांपूर्वी रवी नाईक यांनी आपण मडकईतून निवडणूक लढवू शकतो असे जाहीर विधान करुन खळबळ माजवली होती. या विधानानंतर मडकईत मतदार संघात त्यांच्या वरचेवर भेटी वाढल्या होत्या व चाय पे चर्चाही सुरु होत्या. याच मुद्दय़ावरुन त्यांना छेडले असता, उमेदवारीचा निर्णय भाजपाचे वरिष्ठ घेतील. कुणाला कुठून उमेदवारी द्यायची हा पक्षाचा निर्णय असल्याचे ते म्हणाले.









