सभा, लग्नसोहळय़ांवर मर्यादा : पुर्वीच्याच नियम सर्वांना लागू रात्रीची संचारबंदीचा विचार नाही
प्रतिनिधी /पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध जाहीर केले असून रात्रीची संचारबंदी लावणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. येत्या 26 जानेवारी रोजी एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील कृती ठरविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
पत्रकार परिषदेत त्यांनी वरील माहिती देऊन पुढे सांगितले की, कोरोनासंदर्भात मागे जारी करण्यात आलेली अधिसूचना प्न्हा लागू झाली असून बंद दाराआडचे कार्यक्रम, सोहळे, समारंभांसाठी 50 टक्के उपस्थितीला अनुमती आहे. खुल्या जागेतील सभा-बैठका व इतर कार्यक्रमांना जास्तीतजास्त 100 लोकांनाच भाग घेता येणार आहे. लोकांनी कोरोनाचे नियम, अटी मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे व काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले आहे.
दरम्यान, सरकारने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची फारशी गंभीरतेने दखल घेतल्याचे दिसून येत नाही. शेजारी महाराष्ट्र कर्नाटक सरकारने हद्दींवर कडक निर्बंध लागू केले असून गोवा सरकारने त्या दृष्टीने काहीच तयारी केलेली नाही. गोव्यात कोरोनाचे रुग्ण मोठय़ा संख्येने वाढत असून पर्यटकांची ये-जा देखील सुरू आहे. गोवा सीमेवर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे दोन्ही शेजारील राज्यातील लोक आरामात गोवा सीमा ओलांडून राज्यात येत असून त्यांना परत आपल्या राज्यात जाताना मात्र अडचणी निर्माण झाल्या आहेत.
कर्नाटक-महाराष्ट्र सरकारने काही निर्बंध लागू केले असून काही ठिकाणी दोन्ही कोरोना लसांसह 72 तासांचा आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल दाखवणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे गोवा राज्यातून दोन्ही शेजारील राज्यात जाताना अडचणी येत असल्याचे समोर आले आहे.









