गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांचा आरोप : कचऱयावर राजकारण करू नका, मायकल लोबोंकडून भाजपच्या गैरकारभाराचा पर्दाफाश
प्रतिनिधी /मडगाव
सार्वजनिक सुविधा राजकारणापेक्षा सर्वोच्च आहेत आणि त्यामुळे कचऱयावर राजकारण करू नका, असे गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी भाजपला सांगितले आहे. सोनसडा कचरा प्रश्नावर आणलेल्या सर्व उपायांना भाजप रोखत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सोनसडा येथील कचऱयाचा प्रश्न सोडविला नाही, तर भाजप प्लेगसारख्या गंभीर आजाराला आमंत्रण देईल, असे ते म्हणाले.
नगरविकास मंत्रालयाच्या निष्क्रियतेमुळे सोनसडा कचरा प्रक्रिया प्रकल्पाची मंजुरी प्रलंबित असल्याच्या कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांच्या टिप्पणीचा संदर्भ देत फातोर्डाचे आमदार सरदेसाई म्हणाले की, लोबो यांनी भाजपच्या चुकीच्या कारभाराचा पर्दाफाश केला आहे. सरदेसाई यांनी मडगावचे नगराध्यक्ष लिंडन पेरेरा आणि इतर नगरसेवकांसह पत्रकार परिषद घेऊन भाजपने कशा पद्धतीने सोनसडय़ाचेही काम रोखले आहे ते उघड केले.
दामू नाईक यांनी उपाय रोखल्याचा आरोप
भाजप नेते दामू नाईक यांनी सत्तेचा वापर करून सोनसडय़ाचा उपाय रोखल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि दामू नाईक हे डबल इंजिन असून ते फातोर्डाच्या विकासाला खीळ घालत आहेत. त्यांनी सोनसडा येथील कचरा व्यवस्थापनाबाबत गोंधळ निर्माण केला आहे, असा दावा सरदेसाई यांनी केला. माझी सरकारला विनंती आहे की, सोनसडय़ाचा प्रश्न निकाली काढावा, जेणेकरून मडगाव, फातोर्डा आणि कुडतरी येथील लोकांना तत्काळ दिलासा मिळेल. ही समस्या आता सुटली नाही, तर पुढील अनेक वर्षे तशीच राहील, असे ते म्हणाले.
तज्ञ समितीने पाहणी करूनही अजून मंजुरी नाही
त्यांनी असेही सांगितले की, मडगाव पालिकेने सोनसडा डंप यार्ड येथे 25 टीपीडी वीजनिर्मितीसह दोन बायो-मिथेनेशन प्लांट उभारण्याच्या दृष्टीने ‘प्रस्तावासाठी विनंती’ केली होती. तथापि, यात सहभागी होण्यास इच्छुक कंपन्या असूनही आणि पद्मश्री शरद काळे यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञ समितीने 11 डिसेंबर रोजी जागेची पाहणी करूनही, सरकारकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही, याकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधले.
पालिकेला निधी नको, मंजुरी हवी
मडगाव पालिका सरकारकडे पैसे मागत नाही, ते 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून पैसे वापरणार आहेत. पालिकेला फक्त मंजुरी हवी आहे, पण ती सरकारकडून दिली जात नाही. त्यामुळे विरोधी आमदार असलेल्या मतदारसंघात भाजप कोणतेही काम चालू करायला तयार नसल्याचे स्पष्ट होत आहे, असा आरोप सरदेसाई यांनी केला.
कामे सुरू न झाल्यास न्यायालयात धाव घेणार
नगरवनामध्ये कचऱयाचा विल्हेवाट लावण्याची सूचना देणारे पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांचीही त्यांनी खिल्ली उडवली आणि याच काब्राल यांनी मोले येथे एक लाख झाडे तोडली, असेही उद्गार काढले. शहरांमध्ये राहणाऱया लोकांसाठी नगरवन आवश्यक आहे. मला त्याचे महत्त्व माहीत आहे, असे सरदेसाई म्हणाले. फातोर्डा येथील विकासकामे रखडल्याप्रकरणी संबंधित विभागाला नोटीस पाठवली असून जनतेच्या हिताची ही कामे सुरू न झाल्यास न्यायालयात धाव घेणार असल्याचेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले.









