पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षा धोक्यासंबंधी अनुराग ठाकूर यांचा प्रश्न, घातपाताचा संशय केला व्यक्त
लखनौ / वृत्तसंस्था
बुधवारी पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेला निर्माण झालेल्या गंभीर धोक्यासंबंधी सोनिया गांधी, राहुल गांधी आदी नेते मूग गिळून गप्प का आहेत, असा प्रश्न केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे. या नेत्यांच्या मौनावरुन त्यांच्या मनात पंतप्रधान मोदींविषयी कोणती भावना आहे, हे लक्षात आल्यावाचून रहात नाही. त्यामुळे पंजाबमध्ये घडलेल्या प्रसंगाची कसून चौकशी केली जावी. हा घातपाताचा कट असू शकतो, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
दूरदर्शनने प्रसारित केलेल्या एका कार्यक्रमात ते शुक्रवारी बोलत होते. पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेला पंजाबमध्ये निर्माण झालेला धोका ही गंभीर बाब आहे. पंजाब सरकारच्या ढिलाईमुळे ही स्थिती निर्माण झाली. तरीही ज्येष्ठ काँगेस नेते जणू काही घडलेलेच नाही, असा अविर्भावात मौन पाळून आहेत. अन्य विरोधी पक्षांचे नेतेही गप्पच आहेत. ही बाब अधिकच गंभीर आहे. हे मौन बरेच बोलके असून हा प्रसंग नेमका कोणी घडविला यावर प्रकाश टाकणारे आहे. या देशातील जनता सूज्ञ आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या मौनाचा अर्थ तिला बरोबर समजतो, अशा अर्थाची सूचक टिप्पणी अनुराग ठाकूर यांनी कार्यक्रमात बोलताना केली.
अशी ढिलाई झालीच कशी ?
पंतप्रधान मोदी राज्यांचा दौरा करतात तेव्हा शिष्टाचार ठरलेला असतो. त्या प्रमाणे राज्य सरकारला सुरक्षा व्यवस्था ठेवावी लागते. यात कुचराई करुन चालत नाही. पण पंजाब सरकारने ही दक्षता घेतली नाही. त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्यांना या प्रश्नाचे गांभीर्य समजत नाही, त्यांचा पर्दाफाश झाल्याखेरीज राहणार नाही, याची त्यांनी खात्री बाळगावी. म्हणूनच या प्रकरणाची सखोल आणि सविस्तर चौकशी होणे आवश्यक असून जो दोषी असेल तो कोणीही असला तरी त्याला उघडे पाडले पाहिजे आणि अशा व्यक्तीला कठोरातील कठोर शिक्षा दिली पाहिजे, असे प्रतिपादन अनुराग ठाकूर यांनी केले.
प्रकरण धसाला लावणार
भाजप पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेच्या धोक्याचे हे प्रकरण धसाला लावल्याशिवाय राहणार नाही. हा एका व्यक्तीच्या सुरक्षेचा प्रश्न नाही. देशाच्या प्रतिष्ठेचाही आहे. त्यामुळे दोषींना शोधल्याशिवाय केंद्र सरकार गप्प बसणार नाही. दोषी कितीही प्रभावी असला तरी त्याला त्याच्या कृतीचे परिणाम भोगावेच लागतील, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या इतरही अनेक नेत्यांनी केले आहे.
विरोधी पक्षांना हिंदुत्व आठवते
निवडणूक जवळ आली की विरोधी पक्षांना हिंदुत्व आठवते हे आता स्पष्ट झाले आहे. उत्तर प्रदेशसारख्या महत्वाच्या राज्यात आता निवडणूक होणार आहे. त्यामुळे कालपर्यंत जीनांसंबंधी कौतुकाने बोलणारे आणि मंदिरांमध्ये बाँबस्फोट घडवून आणणाऱयांविरोधातील खटले मागे घेणारे अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्यासारखे नेते अचानक आपले हिंदुधर्मप्रेम दाखवू लागले आहेत. मंदिरांना भेटी देऊन पूजाआर्चा करु लागले आहेत. मात्र, हे त्यांचे हिंदूधर्मप्रेम बेगडी आहे, याची जाणीव मतदारांना आहे. मतदार भुलणार नाहीत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
राम मंदिर 2 वर्षांमध्ये बांधणार
मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नही बताएंगे अशी टीका अखिलेश यादव भाजपवर करतात. तथापि, भाजप सरकार येत्या दोन वर्षांमध्ये भव्य राममंदिराची निर्मिती आयोध्येत रामजन्मस्थळी करणार आहे, याची शाश्वती विरोधकांनी बाळगावी. ज्यांनी राममंदिराला पूर्वी प्राणपणाने विरोध केला तेच आता राममंदिराच्या निर्माणासंबंधी भाजपला प्रश्न विचारत आहेत, यावरुन त्यांची दांभिकता स्पष्ट होते, अशीही टीका ठाकूर यांनी केली.
देशभरातून तीव्र प्रतिक्रिया
ड बुधवारी पंजाबमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षा धोक्यासंबंधी चिंता
ड अनेक मान्यवरांनी व्यक्त केली तीव्र प्रतिक्रिया, हा प्रकार धोकादायक
ड केंद्र सरकार करणार पंजाब पोलिसांची चौकशी, समितीची स्थापना
ड हे प्रकरण घातपातचे असणे शक्य, अनेक राजकीय तज्ञांनी प्रतिक्रिया









