रिलायन्सची एनपीसीआयसोबत युपीआय ऑटोपेची घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रिलायन्स जिओने नॅशनल पेमेन्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)सोबत नव्या ऑटोपे सुविधेचा प्रारंभ केला आहे. युपीआय ऑटोपेची सुविधा देणारी ही पहिली टेलिकॉम कंपनी बनली असल्याचे बोलले जात आहे. सदरच्या सेवेची घोषणा करत कंपनीने या सर्व्हिसच्या मदतीने कोटय़वधी ग्राहकांना पुन्हा पुन्हा रिजार्च करण्याच्या तणावातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. महिन्याचे शुल्क ग्राहकाच्या खात्यातून दर महिन्याला ठराविक तारखेला वजा केले जाणार आहेत. जिओ ग्राहकांना आपल्या पसंतीच्या टॅरिफ प्लॅनसाठी युपीआय ऑटोपेचा वापर करण्यासाठी (मायजिओ) ऍपवर ऑर्डर सेट करता येणार आहे.
सेवा कधीही बंद करता येणार
जिओ ग्राहक युपीआयवर आधारीत ऑटोपे सेवा आपल्या नियमावलीसह ऍपवर सेट करुन सदरची सेवा नको असल्यास बंद करता येणार असल्याची माहिती आहे. यासोबतच ही सेवा अधिक सुरक्षित असल्याचा दावा एनसीआयचे मुख्य अधिकारी कुणाल यांनी केला आहे.
अन्य कंपन्याही तयारीत
जिओची युपीआय ऑटोपे सर्व्हिस आल्यानंतर आता आगामी काळात भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियासारख्या कंपन्याही यात उतरतील.
काय आहे युपीआय ऑटोपे?
रिलायन्स जिओने युपीआयवर आधारीत ऑटोपे सर्व्हिस जिओ ग्राहकांसाठी देण्यासाठी या योजनेचे सादरीकरण केले आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना आपण रिचार्ज केलेली तारीख लक्षात राहत नसते. रिचार्ज वेळीच त्या तारखेला न केले गेल्यास त्यामुळे ही सर्व्हिस बंद होऊ शकते. तसे होऊ नये याकरीता ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान 5 हजार रुपयांच्या रिचार्जवर युपीआय पिन नंबर देण्याची गरज ग्राहकांना नसणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यावरील रक्कमेचे रिचार्ज करायचे झाल्यासच युपीआय पिन नंबर द्यावा लागणार आहे.









