प्रतिनिधी / म्हसवड :
म्हसवड येथील मायणी चौकानजीक असलेल्या वसाहतीमधील सविता सुखदेव शिंदे यांच्या बंद बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 77 ग्रॅम वजनाचे अंदाजे 3 लाख 8 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची तक्रार म्हसवड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यात सविता शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शिंदे या 4 जानेवारीला पानवन येथे सासरी गेल्या होत्या. त्या रात्री तिथेच मुक्कामाला होत्या. त्यामुळे घर बंद होते. दुसऱ्या दिवशी दि. 5 रोजी सकाळी 7 वाजता शिंदे यांच्या शेजारी रहात असलेल्या जाधव यांनी फोन करुन शिंदे यांच्या घरात चोरी झाल्याचे सांगितले. त्यानंतर शिंदे कुटुंब सकाळी 10 वाजता म्हसवड येथील आपल्या घरी परतले असता त्यांना कपाटातील 3 लाख 8 हजार रुपये किमतीचे 7 तोळे 7 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे उघड झाले. त्यानंतर सविता सुखदेव शिंदे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास सपोनि बाजीराव ढेकळे, डीवायएसपी निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.