संजय पाटील-यड्रावकर यांची टीका
कोल्हापूर/प्रतिनिधी
आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा विजय म्हणजे राजू शेट्टी यांना प्रचंड मोठा धक्का आहे. राजू शेट्टी हे होमपिचवर भुईसपाट झाल्याने आता राज्यात त्यांची भीती बाळगण्याची गरज नाही, अशी टीका आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांची राजू शेट्टी यांच्यावर केली आहे.
कोल्हापूर जिल्हा बँकेत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे विजयी झाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. संजय पाटील यड्रावकर पुढे म्हणाले, राजेंद्र पाटील यांचा विजय म्हणजे संपूर्ण ठराव धारकांचा विजय आहे. त्यांचा हा विजय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना धक्का मानला जातो. संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे शिरोळ तालुक्यात शेट्टीचे काय आहे? होमपिचवरच राजू शेट्टी हे स्ट्रॉंग नाहीत हे ह्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे, असे संजय पाटील यड्रावकर म्हणाले.