संजीव खाडे / कोल्हापूर
1985 चा तो काळ. त्याकाळी अनाथांची माय असणाऱ्या सिंधुताईच्या कार्याचे रोपटे नुकतेच वाढू लागले होते. अनाथांच्या वेदना भाषणातून मांडत ही माय मदतीसाठी पदर पसरत होती. त्यासाठी ती राज्यभर फिरत होती. फिरत फिरत ती कोल्हापूरला आली आणि शेवटच्या श्वासापर्यंत कोल्हापूरशी तिचा असणारा ऋणानुबंध, स्नेह कायम राहिला. त्याला कारण होते, माजी महापौर भिकशेठ पाटील. नव्वदच्या दशकाच्या मध्यांत्तरावेळी सिंधुताईंना भिकशेठअण्ण्णांनी दिलेली साथ आणि केलेली मदत त्या शेवटपर्यंत विसरल्या नाहीत.
आज भिकशेठ पाटील या जगात नाहीत. पण त्यांनी बहीण मानलेल्या सिंधुताईंच्या आठवणी मात्र पाटील कुटुंबीयांनी जपून ठेवल्या आहेत. भिकशेठ पाटील यांच्या पत्नी रत्नप्रभा आणि मुलगा धनंजय यांनी माईंच्या आठवणी जागविल्या. पाटील कुटुंबीय सिंधुताईंना आदराने माई म्हणत असे. 1985 च्या सुमारास दूरदर्शनवर भिकशेठ पाटील त्या काळी लोकप्रिय असणारा ‘आमची माती आमची माणसं’ कार्यक्रम पाहत होते. त्यामध्ये सिंधुताई सपकाळ यांच्यावरील भाग होता. तो पाहून भिकशेठअण्णा प्रभावित झाले. अनाथांना आसरा देण्यासाठी धडपडणाऱ्या सिंधुताईंना आपणही मदत करायची हे त्यांनी ठरविले. पुढे काही दिवसांनी मदत मिळविण्यासाठी सिंधुताई कोल्हापूरमध्ये आल्या. त्या महालक्ष्मी धर्मशाळेत राहिल्याची माहिती भिकशेठअण्ण्णा मिळाली. ते तडक तेथे गेले. त्यांनी सिंधुताईंना थेट शिवाजी पेठेतील मरगाई गल्लीतील आपल्या घरी आणले. पत्नी रत्नप्रभा यांना सांगितले, आजपासून ही माय (सिंधुताई) जेव्हा जेव्हा कोल्हापूरमध्ये येईल. तेंव्हा ती आपल्या घरी राहिल. त्या दिवसापासून सिंधुताई या पाटील कुटुंबीयांच्या सदस्य बनून गेल्या. पुढे तीन तीन महिने त्या पाटील यांच्या घरी राहिल्या.
नव्वदच्या मध्यावर सिंधुताई अनाथ मुलांसाठी संस्था उभारण्यासाठी धडपड होत्या. त्यांचे मदतीसाठी राज्यभर दौरे सुरू होते. गावागावात जायचे, तेथे भाषण करायचे, लोकांना मदतीचे आवाहन करायचे हा त्यांचा दिनक्रम होता. त्यांच्या कोल्हापूर दौऱ्याचे भिकशेठ पाटील (तेव्हा ते महापौर झाले नव्हते) नियोजन करत. कोल्हापूर जिल्ह्य़ातील सर्व सहकारी साखर कारखानाने, सहकारी बँकांचे चेअरमन, एमडीला फोन करणे, विविध महाविद्यालये, शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, संस्थाचालकांना फोन करून सिंधुताईंच्या भाषणाचा कार्यक्रम आयोजित करणे हे काम भिकशेठअण्ण्णांनी नेटाने केले. शिवाजी विद्यापीठातही सिंधुताईंचा कार्यक्रम झाला.
आपल्या स्वतंत्र अकृत्रिमशैलीत सिंधुताई कार्यक्रमात भाषणातून अनुभव, व्यथा आणि भावना मांडत. अभंग, ओव्या सांगत. त्यांच्या भाषणात अनेकांना आपले अश्रू आवरता येत नसत. पण अनाथांची आई, माई होण्याचे मनोमनी पक्के केलेल्या सिंधुताई कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजच्या समोरच आपला पदर पुढे करून मदतीची साद घालत. त्यांच्या आवाहनाला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळे. कार्यक्रम संपवून ही माय पाटील यांच्या घरी आल्यावर जमलेली नाणी (चिल्लर) आणि नोटा मोजण्यात वेगळा आनंद मिळत असे, त्यावेळी संगीता अंबपकर, रत्नप्रभा भिकशेठ पाटील, (कै.) सावित्री मेंगाणे, (कै.) सरलाताई नारायण पडवळे, सुजाता शिंदे-मगदूम, राहुल शिंदे, दीपाली शिंदे, अभिजित भिकशेठ पाटील, राजू माने (मनपा पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी), सुरेश पाटील, धनंजय शंकरराव माने, बंडा उर्फ धनंजय खानोलकर (प्रॉव्हीडंट फंडचे अधिकारी), संजय पाटील, अनिल अपराध, तुकाराम-दोनवडेकर यांच्यासह मरगाई गल्लीतील महिला, मुले मदतीला येत असत, अशी आठवण भिकशेठ पाटील यांचे पुत्र धनंजय पाटील यांनी सांगितली.
सिंधुताई अत्यंत साध्या होत्या. साधी नऊवारी साडी, डोक्यावर पदर, प्रेमाने बोलणे हे त्यांनी जपले होते. मलाही त्या पदर डोक्यावर खाली येऊ देऊ नकोस, असे सांगत. आमच्या घरात साहेबांचे (भिकशेठ पाटील) ग्रंथालयच आहे. त्यातील अनेक पुस्तके, ग्रंथ सिंधुताई तासन-तास वाचत बसत असत. चिखलदऱ्यातील पद्धतीचे जेवणही मी त्यांना करून घालत असे. कोल्हापूर दौऱ्यात आमच्या घरची त्यांची भेट कधीही चुकली नाही, शिवाजी पेठेतील अनेकांशी त्यांचा स्नेह होता, अशा आठवणी भिकशेठ पाटील यांच्या पत्नी रत्नप्रभा पाटील यांनी जागविल्या