नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या लसीकरणाचा वेग वाढवा असा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश. पंजाब, गोवा, मणीपूर आणि उत्तराखंड या राज्यांना दिला आहे. या राज्यांमध्ये येत्या दोन महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मतदान प्रक्रियेत कोरोनाचा अडथळा येऊ नये म्हणून आयोग प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून लसीकरणावर भर देण्याचा हा आदेश आहे.
या निवडणुका पार पाडणारे अधिकारी आणि कर्मचारीवर्ग हे आघाडीवरचे सेवक असल्याने त्यांचेही लसीकरण लवकरात लवकर करण्यात यावे. तसेच त्यांना प्रीकॉशनरी किंवा बूस्टर डोसही देण्यात यावा. त्यांचे काम सुरु होण्यापूर्वी त्यांच्या लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी निवणुका होत असलेल्या सर्व राज्यांना पत्र पाठवून हा आदेश कळवला आहे. आयोग जानेवारीच्या पूर्वार्धात निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करणार असून त्यानंतर त्वरित निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू केली जाईल. तेव्हापासून निवडणूक प्रक्रियेला आरंभ होणार आहे.









