उपमुख्यमंत्री बाबु आजगावकर यांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल
प्रतिनिधी /पेडणे
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे सरकार आम्ही घडवले, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावे. दहा हजार नोकऱयापैंकी किती नोकऱया आपल्या पेडणे मतदारसंघात दिल्या आहेत, ते जाहीर करावे. सरकार आम्हाला फसवत आहे. आता पेडणेकरच त्याबद्दल त्यांना जाब विचारून आवाज करतील, असे उद्गार उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी काढले आहेत.
कोरगाव येथील क्रीडा मैदानाच्या दुसऱया टप्प्यातील साडेचार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱया प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर आजगांवकर यांनी वरील उद्गार काढले.
तानावडे आर्लेकरना पवित्र करतात
भाजपात प्रवीण आर्लेकर यांना घेतले, म्हणून मला वाईट वाटले नाही. पक्ष वाढवा, मात्र उमेदवारी आपल्यालाच मिळायला हवी. भाजपा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे हे पूर्वी आपल्याला प्रवीण आर्लेकर यांचे वडिल चरस विकतात, त्याला बाबु तू जाब विचार आणि पेडणे मतदारसंघात त्याबाबत जागृती कर, असे म्हणायचे. ते तानावडे आता त्याच आर्लेकर यांना भाजपात घेऊन त्याला पवित्र करत आहेत, असा आरोपही आजगांवकर यांनी केला.
यावेळी व्यासपीठावर कोरगावचे उपसरपंच समील भाटलेकर, माजी सरपंच प्रमिला देसाई, फादर क्लिफर्ड कास्तेलीन, उल्हास देसाई, चांदेल सरपंच संतोष मळिक, रामा सावळ देसाई, मार्पुस, विश्वनाथ तिरोडकर, मुकुंद जाधव, विशाल भाईडकर आदी उपस्थित होते.
पेडण्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवावे
आजगावकर यांनी पुढे सांगितले की धारगळ येथे 50000 हजार प्रेक्षकांना बसण्याची क्षमता असणारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान उभारले जाणार आहे, 36 कोटी खर्च करून सावळवाडा पेडणे येथील इंडोर स्टेडियम उभारलेला आहे, आता दुसऱया टप्प्यातील कोरगाव मैदानाला चालना दिली आहे, त्याचा लाभ क्रीडा प्रेमींनी घेऊन आपले नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवावे.
कोरगावचे उपसरपंच समीर भाटलेकर यांनी बोलताना उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या कार्याची दखल घेऊन पुन्हा एकदा जनता त्यांना विजयी करील, असा विश्वास व्यक्त केला,
माजी सरपंच प्रमिला देसाई यांनी कोरगावात विकासकामे आजगावकर यांच्या सहकार्यातून चालू असल्याचे सांगितले. फादर क्लिफर्ड यांनीही मनोगत व्यक्त केले. नीता देसाई व निकिता शेख यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सुशांत मांदेकर यांनी सूत्रसंचालन केले. मार्पुस फर्नांडिस यांनी आभार मानले.









