मध्यरात्री घडलेली घटना, 20 लाखांचे नुकसान, चोरीच्या प्रयत्नातून आग लागल्याचा संशय, चोरटय़ांनी 6 दुकाने फोडण्याचा प्रकार
प्रतिनिधी /काणकोण
लोक नववर्षाच्या स्वागतात मग्न असताना 1 रोजी मध्यरात्री मडगाव-कारवार मार्गावरील पैंगीण बाजारात असलेल्या प्रभाकर पैंगीणकर अँड सन्स या किराणामालाच्या दुकानाला आग लागून अंदाजे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले. या आगीत पैंगीणकर यांच्या किराणामालाबरोबर हिशेबाची पुस्तके, बँकेची पासबूक, अन्य महत्त्वाचे दस्तऐवज जळून खाक झाले आहेत. चोरी करण्याच्या प्रयत्नातून ही आग लागली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत असून यापूर्वी या दुकानात दोन वेळा चोऱया झाल्या असल्याची माहिती पैंगीणकर यांचे पुत्र जयप्रकाश पैंगीणकर यांनी दिली.
पैंगीणकर यांच्या किराणामालाच्या दुकानाला आग लागण्यापूर्वी पैंगीण बाजारातील एकाच वेळी 6 दुकानांची कौले काढून अज्ञात चोरांनी दुकानांत प्रवेश केला. बाजारातील अत्यंत जुन्या दयानंद हॉटेल इमारतीत शिरून टेबलाच्या खणातील काही चिल्लर लंपास करण्यात आली. तसेच रूपेश पैंगीणकर यांचे दारूचे दुकान, दीपक भंडारी यांचे दुकान, मारिना बार, पद्मनाभ भट यांचे आईस्क्रीम पार्लर आणि तुकाराम नाईक यांच्या दुकानात चोरटय़ांनी प्रवेश केला व हाताला सापडेल ते घेऊन पसार झाले. काही दुकानांतील सामानाच्या बरण्या आणि अन्य सामान, तर काही दुकानांतील पाण्याच्या, शीतपेयांच्या बाटल्या अस्ताव्यस्त टाकून देण्यात आल्या होत्या.
12 हजारांची रोकड लंपास
तुकाराम नाईक यांच्या दुकानात बँकेचा हप्ता भरण्यासाठी ठेवलेली अंदाजे 12 हजारांची रक्कम पळविण्यात आली आणि दुकानातील सामान अस्ताव्यस्त टाकण्यात आले, अशी माहिती नाईक यांनी दिली. त्यामुळे हा प्रकार एकटय़ाचा नसून यात एखादी टोळी गुंतलेली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पैंगीणचे माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर पैंगीणकर यांना या घटनेने जबरदस्त धक्का बसला आहे. आजारामुळे त्यांनी आपल्या धंद्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यांचे पैंगीण बाजारातील दुकान हे सर्वांत जुने असे किराणामालाचे दुकान असून त्यातील संपूर्ण माल जळून खाक झाला आहे. इमारत पूर्णपणे जळून गेली असून भिंतींना तडे गेले आहेत. विशेष म्हणजे महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत.
सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली
नोकरीनिमित्त मडगावला स्थायिक झालेल्या अनंत अग्नी यांच्या सतर्कतेमुळे फार मोठा धोका टळला, अशा शब्दांत जयप्रकाश पैंगीणकर आणि अन्य व्यापाऱयांनी कृतज्ञता व्यक्त केली. अग्नी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग साधारणपणे 12 ते 12.30 च्या दरम्यान लागली असावी. आपण आपल्या आईची विचारपूस करण्यासाठी गावात आलो होतो. पहाटे 2 च्या दरम्यान फटाके वाजत असल्यासारखा आवाज ऐकायला येऊ लागला. आपण काही जण नववर्षाचा आनंद लुटत असावेत असा अंदाज केला. परंतु आवाज अधिकच जोराने यायला लागल्यानंतर आपल्या घराचे दार उघडले असता दुकानाने घेतलेला पेट आपण पाहिला आणि लगेच काणकोणच्या अग्निशामक दलाला आणि दुकानाच्या मालकाला फोन केला. काणकोणच्या अग्निशामक दलाच्या पथकाने लगेच घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. नपेक्षा संपूर्ण बाजार जळून खाक झाला असता, असे अग्नी यांनी सांगितले.
चोरीच्या प्रयत्नातून आग लागली असावी : पैंगीणकर
पैंगीण पंचायतीचे माजी पंच असलेल्या जयप्रकाश पैगीणकर यांनी गावात त्यांचे कोणाशीही वैरत्व नाही, असे सांगितले. त्यांच्या दुकानाला जी आग लागली तो घातपाताचा प्रकार नसून निव्वळ चोरीच्या प्रयत्नातून झालेला आहे असे दिसते. कौले काढून दुकानात प्रवेश केल्यानतंर चोरांनी मेणबत्ती पेटवली असावी आणि हाताला मिळेल ते सामान घेऊन जाताना पेटती मेणबत्ती तशीच टाकून पळ काढला असावा. आपल्या दुकानात तेलाची पाकिटे, कडधान्ये आणि अन्य माल होता. त्यांनी लगेच पेट घेतला असावा, असा संशय पैंगीणकर यांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी पहिल्यांदा चोरी झाली त्यावेळी आपल्या दुकानातून मिरी चोरण्यात आली होती. दुसऱयांदा चोरी झाली त्यावेळी रोकड पळविण्यात आली होती. म्हणून आपण दुकानात रोकड ठेवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री निधीतून मदत करणार : इजिदोर
पैंगीणकर यांच्या दुकानाला आग लागल्याचे समजताच उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी पैंगीण बाजाराला भेट देऊन घटनेची माहिती मिळविली. या बाजारात यापूर्वी देखील बऱयाच वेळा अपघात घडले आहेत. त्यामुळे येथील व्यापाऱयांनी दुकानांचा विमा उतरवावा, असे फर्नांडिस यांनी सूचित केले. या दुर्घटनेत पैंगीणकर यांना बराच फटका बसलेला आहे. मुख्यमंत्री निधीतून त्यांना अधिकाधिक मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अग्निशामक दलाची चांगली कामगिरी
रात्री 2.30 च्या दरम्यान काणकोणच्या अग्निशामक दलाला आगीची खबर मिळताच लगेच पथक घटनास्थळी धावून आले. या पथकातील ए. एस. परीट, प्रशांत वेळीप, ए. एम. गावकर, डी. आर. देसाई, ओ. यू. मोखर्डकर, एस. एस. मोखर्डकर यांनी आग विझविण्याचे काम केले. त्यासाठी दोन टँकर इतके पाणी वापरावे लागले. काणकोणच्या पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन घटनेचे गांभीर्य जाणून घेतले. मुख्य रस्त्यावर ज्या ज्या भागात सीसीटीव्हीची सोय आहे त्या ठिकाणी जाऊन तपासकामाला पोलिसांनी सुरुवात केली आहे. काणकोणचे पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामचंद्र नाईक पुढील तपास करत आहेत.
पोलीस पहारा ठेवण्याची मागणी पाच-दहा वर्षांपूर्वी ज्यावेळी पैंगीण बाजारात चोरीच्या वारंवार घटना घडत होत्या त्यावेळी या ठिकाणी रात्रभर पोलीस पहारा ठेवला जायचा. त्याच धर्तीवर यापुढे देखील बाजारात पोलिसांनी गस्त घालावी, अशी मागणी व्यापारी वर्गाने केली आहे. या घटनेची खबर मिळताच माजी मंत्री रमेश तवडकर, पैंगीणचे सरपंच जगदीश गावकर, लोलयेचे सरपंच सचिन नाईक यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचे अवलोकन केले. पैंगीण बाजारात अशा प्रकारे एका दुकानाला आग लागण्याची ही पहिलीच घटना असून दाटीवाटीने असलेली दुकाने वाचली असली, तरी या प्रकारात सराईत चोरांचा हात असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.









