4 टक्के दराने 20 लाखांपर्यंत कर्ज : उच्च शिक्षण, कौशल्य विकास, उद्योग स्थापनेसाठी होणार मदत
प्रतिनिधी /पणजी
महिलांसाठी दरमहा 5000 रुपये आर्थिक आधार देणारी ’गृह लक्ष्मी’ योजना जाहीर केल्यानंतर तृणमूल मगो युती पक्षाने युवकांना 4 टक्के इतक्या अल्प व्याजाने 20 लाख रुपयेपर्यंत कर्ज देणारी योजना जाहीर केली आहे.
’युवा शक्ती क्रेडिट कार्ड’ असे नाव देण्यात आलेल्या या योजनेची रविवारी घोषणा करण्यात आली. त्याद्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक, युवतींना उच्च शिक्षण, उद्योग-व्यवसाय सुरू करणे शक्य होणार आहे. या योजनेंतर्गत कर्जासाठी सरकारच हमी देणार असल्याने वित्तीय संस्थेकडे अन्य काहीही तारण ठेवावे लागणार नाही, असेही पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.
त्यावेळी मगोचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर, चर्चिल आलेमाव, आलेक्स रेजिनाल्ड, किरण कांदोळकर, यतीश नाईक, राजेंद्र काकोडकर, एथेल लोबो, अविता बांदोडकर, समील वळवईकर, संदीप वझरकर, सेऊला वाझ, आनंद नाईक, साकेत गोखले आदी मान्यवरांची उपस्थिती होती. युतीचे सरकार सत्तेवर आल्यास ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येईल, असे ढवळीकर यांनी सांगितले.
उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी वा त्यांच्या पालकांना महागडी फी देणे शक्य होत नाही. तसेच एखादा उद्योग, व्यवसाय करायचा म्हटल्यासही आर्थिकदृष्टय़ा शक्य होत नाही. सदर योजनेच्या लाभार्थींना ही समस्या सतावणार नाही, असे ते पुढे म्हणाले.
बेरोजगारी दरात गोवा देशात 8व्या क्रमांकावर आहे. अशावेळी ’युवा शक्ती कार्ड’ अंतर्गत कर्ज घेऊन युवकांना उच्च शिक्षण, कौशल्य विकास व उद्योग स्थापनेसाठी सरळ मदत मिळणार आहे. त्याचबरोबर कोविडमुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यातही ही योजना लाभकारी ठरू शकते. त्याद्वारे बरोजगारी कमी होऊ शकते. या योजनेच्या सहयोगाने तृणमूल आणि मगोप यांची युती राज्यातील युवकांसाठी ’नवी सकाळ’ घेऊन येणार आहे, असे ढवळीकर पुढे म्हणाले.
अन्य मान्यवरांनीही विचार मांडले. याच पत्रकार परिषदेदरम्यान सहा युवकांनी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणीही केली.









