वृत्तसंस्था/ माऊंट माँगनुई
येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत रविवारी खेळाच्या दुसऱया दिवशी यजमान न्यूझीलंडला बांगलादेशने चोख प्रत्युत्तर दिले. बांगलादेशच्या पहिल्या डावातील 328 या धावसंख्येला उत्तर देताना बांगलादेशने दिवसअखेर पहिल्या डावात 2 बाद 175 धावा झळकविल्या. खेळाच्या तिन्ही सत्रामध्ये बांगलादेशने आपले वर्चस्व राखले होते.
न्यूझीलंडने 5 बाद 258 या धावसंख्येवरून खेळाला पुढे प्रारंभ केला पण बांगलादेशच्या अचूक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे शेवटचे पाच फलंदाज 70 धावांची भर घालत तंबूत परतले. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात कॉनवेने 1 षटकार आणि 16 चौकारांसह 122, यंगने सहा चौकारांसह 52, निकोल्सने 12 चौकारांसह 75, रॉस टेलरने 5 चौकारांसह 31, ब्लंडेलने 2 चौकारांसह 11 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या शेवटच्या पाच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. बांगलादेशच्या गोलंदाजांनी रविवारी उपाहारापूर्वीच 25 षटकांत न्यूझीलंडचे पाच फलंदाज बाद केले. बांगलादेशतर्फे एस. इस्लाम आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी तीन तर मोमिनूल हकने दोन व इ हुसेनने एक गडी बाद केला. न्यूझीलंडचा पहिला डाव 108.1 षटकांत 328 धावांत आटोपला.
बांगलादेशने आपल्या पहिल्या डावाला सावध सुरूवात केली. एस इस्लाम आणि मेहमुदुल हसन जॉय यांनी सलामीच्या गडय़ासाठी 18.1 षटकांत 43 धावांची भागिदारी केली. वॅग्नरने एस. इस्लामला झेलबाद केले. त्याने 1 चौकारांसह 22 धावा जमविल्या. मेहमुदुल हसन जॉय आणि नजमूल हुसेन यांनी दुसऱया गडय़ासाठी 104 धावांची भक्कम भागिदारी केली. वॅग्नरने नजमूल हुसेनला यंगकरवी झेलबाद केले. त्याने एक षटकार आणि सात चौकारांसह 64 धावा जमविल्या. बांगलादेशने दिवसअखेर 67 षटकांत 2 बाद 175 धावा जमविल्या. मेहमुदुल हसन जॉयने 7 चौकारांसह 70 तर कर्णधार मोमिनूल हक 8 धावांवर खेळत आहे. न्यूझीलंडतर्फे वॅग्नरने 27 धावांत 2 गडी बाद केले. बांगलादेशचा संघ अद्याप 153 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 8 गडी खेळावयाचे आहेत.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड प. डाव 108.1 षटकांत सर्वबाद 328 (कॉनवे 122, निकोल्स 75, यंग 52, टेलर 31, ब्लंडेल 11, एस. इस्लाम 3-69, मेहदी हसन मिराज 3-9, इ हुसेन 1-75, मोमिनूल हक 2-6).
बांगलादेश प.डाव-67 षटकांत 2 बाद 175 (मेहमुदुल हसन जॉय खेळत आहे 70, मोमिनूल हक खेळत आहे 8, एस इस्लाम 22, नजमूल हुसेन 64, वॅग्नर 2-27).









