ऑनलाईन टीम / नवी मुंबई
राज्यातील कोरोना संसर्गाची पुन्हा वेगाने वाढणारी संख्या पुन्हा चिंतेचा विषय बनत आहे. दिवसें – दिवस आढळणाऱ्या रूग्णांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची बाब दिसून येत आहे. शिवाय, ओमिक्रॉनचे रूग्ण देखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून कोरोना निर्बंधासाठी पावले उचलली जात असून, रुग्ण संख्येची स्थिती अशीच राहील्यास निर्बंध कठोर केले जाणार असल्याचं राज्या प्रशासनाने यापुर्वीच स्पष्ट केले आहे.
आज दिवसभरात राज्यात ९ हजार १७० नवीन कोरोनाबाधित आढळल्याचे समोर आले आहे. तर, मुंबईत ६ हजार ३४७ नव्या कोरोनाबाधितांची आज नोंद झाली आहे. याशिवाय राज्यात आज सात कोरोनाबाधित रूग्णांचा तर मुंबईत एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे.
आज राज्यात १ हजार ४४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६५,१०,५४१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिक्व्हरी रेट ) ९७.३५ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९१,३६,६४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,८७,९९१ (९.६७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२६,००१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १०६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.