इस्लामपुरात पुन्हा शिवसेना, विकास आघाडी सत्तेवर येणार
प्रतिनिधी / इस्लामपूर
राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक शहराच्या विकासाच्या आड येत आहेत. शिवसेना व विकास आघाडी पुन्हा सत्तेवर येणार आहे. म्हणूनच राष्ट्रवादीचा मोठा नेता शिवसेना व विकास आघाडीत फुट पाडायचे काम करीत असल्याचा आरोप, शिवसेनेचे
जिल्हा प्रमुख व पालिकेचे गटनेते आनंदराव पवार यांनी पत्रकार बैठकीत केला.
पवार म्हणाले, दि. २७ डिसेंबर रोजीच्या बैठकीला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गैरहजरी लावली. त्यामुळे गणपुर्ती अभावी ही सभा रद्द केली. त्यानंतर ३ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी सभेच्या नोटीसा विविध कारणे देत स्विकारल्या नाहीत. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक शहाजी पाटील, विश्वनाथ डांगे, संजय कोरे, झरिना पुणेकर, संगिता कांबळे, वैशाली सदावर्ते, बशीर
मुल्ला, बाबासो सुर्यवंशी, संग्राम पाटील, खंडेराव जाधव, सुनिता सपकाळ, सविता आवटे तसेच उपनगरध्यक्ष दादासाहेब पाटील यांच्या घरी जावून नोटीसा देण्याचा प्रयत्न केला. मात्र हे नगरसेवक घरी नसल्याचे कारण देत नोटीसा स्विकारल्या गेल्या नाहीत. या सर्व नगरसेवकांना स्पिड पोस्टाने नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. दरम्यान प्रत्येक नगरसेवकाच्या व्हॉटसअॅपला नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना तीन तारखेला सभा घेता येत नाही. अशी तक्रार केली आहे. राष्ट्रवादीही विकासाला खोडा घालत आहे. शिवसेनेने याआधी कोणत्याही पक्षावर टिका केली नाही. मात्र राष्ट्रवादीने ११ कोटीला विरोध दर्शवला.
पवार पुढे म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारने ६ मे २०२१ च्या शासन निर्णयामध्ये एखाद्या गावचे, वस्तीचे किंवा रस्त्याचे जातीवाचक नाव बदलून नवीन नाव देण्याचा अध्यादेश काढला आहे. हिंदू व इस्लाम हा धर्म आहे. तर मुस्लिम ही जात आहे. म्हणून आम्ही इस्लामपुरचे ईश्वरपूर करण्यासाठी आग्रही आहोत. ४० हजार लोकांच्या भावनेचा आदर करत ही मागणी केली आहे. यापुढे शिवसेना व विकास आघाडी एकत्र येवून शहराच्या विकासाच्या दृष्टीने व शहराची शोभा वाढेल, असे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सागर मलगुंडे, प्रविण गायकवाड, संग्राम साळुखे, सुभाष जाधव, राजेंद्र पाटील, अतुल सुर्यवंशी, योगेश हुबाले आदी उपस्थित होते.
शासकीय अधिकारी पक्षाचे काम करतात सांगली जिल्हयातील तसेच वाळवा तालुक्यातील काही शासकीय अधिकारी एका विशिष्ठ पक्षाचे काम करत आहेत. त्यांनी शासनाचे काम करावे, असा टोला आनंदराव पवार यांनी लगावला.