प्रतिनिधी / पणजी
गेली 55 वर्षे नियमित दर वर्षी पंढरपुरी विठ्ठलाची वारी करणाऱया आणि पणजीतील फुलांच्या मार्केटमध्ये ‘पिरू फुलकान’ किंवा ‘पिरु मावशी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिवाडी येथील पिरू बांदोडकर (वय 82) यांना दि. 30 डिसेंबर 2021 रोजी पहाटे मुंबई भांडूप येथे देवाज्ञा झाली. संध्याकाळी मुंबईतच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पणजी व तिसवाडीतच नव्हे तर बार्देशातही पिरु फुलकान प्रसिद्ध होत्या. अनेक तीर्थयांत्रांच्या वारी त्या घडवून आणित असत. गेल्या वर्षी कोविड काळ सोडल्यास गेल्या 55 वर्षे त्यांनी पंढरपूरची वारी कधी चुकवली नाही. बाजारात फुले विकत घेण्यास येणारे तिच्याकडून फुले घेतल्यानंतर आशीर्वाद घेतल्याशिवाय जात नसत.
पर्रीकरानी मानला पिरुबायचा शब्द
पणजीतील जुने मार्केट तोडून नवे बांधण्याचा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मांडला होता, तेव्हा व्यापाऱयांनी त्याला विरोध केला. या व्यापाऱयांचे प्रतिनिधीत्व करून पिरु मावशी मुख्यमंत्र्यांना भेटल्या. पर्रीकरांनी त्यांचा शब्द मानला. फक्त तिच्या शब्दामुळे फुलांचे जुने मार्केट तोडण्यात आले नाही. नव्या मार्केटात त्यांना स्थलांतर केल्यानंतरच जुने मार्केट पाडण्यात आले होते. पर्रीकर त्यांना पिरु बाय म्हणून आदराने हाक मारुन तिच्याशी बोलायचे. काही दिवसांपूर्वी त्या भांडूप मुंबई येथे आपल्या मुलीकडे गेल्या होत्या. तेथे अल्प आजारामुळे त्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्या पश्चात कन्या सौ. राजश्री (लता), जावई राजेंद्र सातार्डेकर, नात डॉ. भाग्यश्री असा परिवार आहे.









