शाहू स्मारक भवनमध्ये वाचक,हितचिंतकांच्या उपस्थितीत कार्यक्रम, ‘तरुण भारत’चे समूह प्रमुख, सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी स्वीकारल्या शुभेच्छा, मान्यवरांच्या हस्ते वर्धापन दिन ट्रेंड नवा, ध्यास नवा विशेषांकाचे प्रकाशन
प्रतिनिधी/कोल्हापूर
लाखो वाचकांच्या पाठबळावर निर्भीड बाणा आणि विकासाची दृष्टी घेऊन कोल्हापूरवासियांच्या मनावर गेल्या अडीच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या ‘तरुण भारत’चा 29 वा वर्धापनदिन गुरुवारी वाचक आणि हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादात व अपूर्व उत्साहात साजरा झाला. अनेक राजकीय, शासकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिकसह विविध क्षेत्रातील व्यक्ती व संस्था प्रतिनिधींसह वाचक आणि हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत दसरा चौकातील राजर्षी शाहू स्भारक भवन येथे हा कार्यक्रम सकाळी झाला. ‘तरुण भारत’ चे समूह प्रमुख, सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.
‘तरुण भारत’च्या वर्धापनदिनी प्रतिवर्षी हजारो हितचिंतक आणि वाचकांच्या उपस्थितीत स्नेहमेळाव्यात पार पडतो. पण कोरोना महामारी संकटामुळे यंदा हा सोहळा रद्द करण्यात आला. त्यामुळे गुरुवारी सकाळी शाहू स्मारक भवन येथे ‘तरुण भारत’ चे समूह प्रमुख, सल्लागार संपादक किरण ठाकुर, संपादक जयवंत मंत्री, निवासी संपादक मनोज साळुंखे, मुख्य प्रशासन अधिकारी गिरिधर शंकर आदी मान्यवरांनी वाचक, हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.
दसरा चौकातील ‘तरूण भारत’च्या शहर कार्यालयामध्ये सकाळी 10 वाजता विधीवत पूजा होऊन वर्धापनदिन कार्यक्रमाला सुरूवात झाली. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्यराज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार पी.एन.पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रा. जयंत आसगावकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार नानासाहेब माने, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, जिल्हा बँकेची माजी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, भाजपचे माजी विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, काँग्रेसचे सदस्य तौफीक मुल्लाणी आदी प्रमुख राजकीय मान्यवरांसह कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, जिल्हा परिषदेचे सीईओ संजयसिंह चव्हाण, महानगरपालिका प्रशासक कादंबरी बलकवडे, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, राज्य गुन्हे अन्वेषण कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक दिनेश बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, विभागीय माहिती उपसंचालक डॉ.संभाजी खराट, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, कारागृह पोलीस अधिक्षक चंद्रमणी इंदूरकर, करवीर तहसीलदार शीतल मुळे-भामरे, मनसेचे राजू जाधव, मराठा शौर्यपीठचे प्रसाद जाधव आदी प्रमुख प्रशासकीय अधिकाऱयांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
विशेषांकाचे प्रकाशन
‘तरुण भारत’ वर्धापनदिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या ‘ट्रेंड नवा, ध्यास नवा’ या विशेषांकाचे प्रकाशन ‘तरुण भारत’ चे समूह प्रमुख, सल्लागार संपादक किरण ठाकूर, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार पी.एन.पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराज, मुख्य संपादक जयवंत मंत्री, निवासी संपादक मनोज साळुंखे, मुख्य प्रशासन अधिकारी गिरिधर शंकर आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.