अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष अशरफ गनींचा समावेश
वृत्तसंस्था/ साराजेवो
बेलारुसचे अध्यक्ष अलेक्सांद्र लुकाशेंको यांना एका संस्थेने भ्रष्ट लोकांच्या यादीत पहिल्या स्थानावर ठेवले आहे. ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टकडून (ओसीसीआरपी) 2021 च्या सर्वात भ्रष्ट लोकांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष अशरफ गनी यांनाही सामील करण्यात आले आहे. ओसीसीआरपी जगभरातील स्वतंत्र प्रसारमाध्यमांसाठी नफा न कमाविणारे शोधपत्रकारिकतेचे व्यासपीठ आहे.

ओसीसीआरपीच्या अहवालानुसार या यादीत सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असाद, तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगन आणि ऑस्ट्रियाचे माजी चॅन्सेलर सेबेस्टियन कुर्ज सामील आहेत. स्वतःच्या लोकांना दुःख आणि मरण्यासाठी सोडून देण्यासाठी गनी यांना यादीत सामील करण्यात आले आहे. तसेच त्यांचा भ्रष्टाचार आणि अपात्रतेमुळे त्यांना यादीत स्थान मिळाल्याचे ओसीसीआरपीचे सह-संस्थापक ड्रू सुलिवन यांच्याकडून सांगण्यात आले.

भ्रष्टाचाराशी संबंधित एक अहवाल तयार करणारे 6 पत्रकार आणि तज्ञांच्या एका समितीने लुकाशेंको यांना या यादीत पहिल्या स्थानी ठेवले आहे. या समितीत अरब रिपोटर्स फॉर इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिजम (एआरआयजे) महासंचालक रावन दमन, विल फिट्जगिब्बन, इंटरनॅशनल कंसोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स (आयसीआयजे)चे वरिष्ठ पत्रकार बोयान्ग लिम, पुलित्झर सेंटरचे वरिष्ठ संपादक लुईस शेली, जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटीत शार स्कुल ऑफ पॉलिसी अँड गव्हर्नमेंटमधील लेखक तसेच प्राध्यापक पाल राडू, क्रॉस-बॉर्डर इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टर आणि ओसीसीआरपीचे सह-संस्थापक तसेच संचालक ड्रू सुलिवन यांचा समावेश होता.
67 वर्षीय लुकाशेंको हे 1993 पासून बेलारुसच्या सत्तेवर आहेत. निवडणुकीत गैरप्रकार, टीकाकारांचा छळ करण्यापासून निदर्शकांना अटक तसेच मारहाण यासारख्या घटनांमध्ये त्यांचा हात राहिला असल्याचे ओसीसीआरपीकडून म्हटले गेले.
असाद यांनी सीरियाला एका विध्वंसक गृहयुद्धात लोटले असून सत्तेवर असताना कोटय़वधी डॉलर्सची चोरी केली आहे. तुर्कस्तानात एर्दोगान यांच्या भ्रष्ट सरकारने सरकारी मालकीच्या बँकांचा वापर चीनकरता मनी लॉन्ड्रिंगसाठी केला आहे. तर ऑस्ट्रियन पीपल्स पार्टीचे नेते असलेल्या कुर्ज यांच्यावर लाचखोरीचा आरोप झाला असल्याचे संस्थेकडून नमूद करण्यात आले.









