नागरी भागात दुर्घटना
वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील एल काजोन भागात एक विमान दुर्घटनाग्रस्त झाले असून यात 4 जणांना जीव गमवावा लागला आहे. लियरजेट 35 बिझनेस एअरक्राफ्टमधून हे लोक प्रवास करत होते. ऑरेंज काउंटी येथून झेपावलेले हे विमान सॅन दिएगोच्या दिशेने जात होते अशी माहिती फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशनचे प्रवक्ते रिक ब्रेइटेनफेल्ड यांनी दिली आहे.
उड्डाण केल्यावर लियरजेट विमान खालच्या दिशेने जाऊ लागल्याचे सॅन दिएगो काउंटी शेरिफ विभागाकडून सांगण्यात आले. तज्ञांच्या पथकाने दुर्घटनास्थळी पोहोचून चौकशीस प्रारंभ केला आहे. दुर्घटनेनंतर विमान नागरी भागात कोसळले. विमानाला लागलेली आग अन्य वाहनांमध्येही फैलावली.
अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले, परंतु दुर्घटनेत विमानातून प्रवास करणाऱया कुठल्याच प्रवाशाला वाचविता आले नाही. दुर्घटनेमुळे एका घरालाही मोठे नुकसान पोहोचले आहे. तसेच संबंधित भागातील वीजपुरवठा रोखण्यात आला आहे.









