एका रुग्णाचा मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या 535 : लुईझिन फालेरो यांना कोरोनाची लागण

प्रतिनिधी /पणजी
गोव्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढीस लागल्याचे समोर येत असून गेल्या 24 तासात म्हणजे मंगळवारी 112 नवे कोरोना रुग्ण सापडले आणि सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 500 चा टप्पा ओलांडून पुढे गेली असून 535 झाली आहे. दिवसभरात एका बळीची नोंद झाल्यामुळे एकूण मृतांचा आकडा 3520 वर पोहोचला आहे.
सर्व 112 नवीन कोरोना बाधितांना होम आयसोलेशन देण्यात आले असून 41 जण कोरोनातून बरे झाले आहेत. गोव्यात आतापर्यंत मिळून एकूण 180229 जणांना कोरोनाची बाधा झाली होती त्यापैकी 176174 जण कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोना संसर्गाचा दर वाढून तो 4.03 टक्क्यांवर पोहोचला आहे.
तृणमूलचे लुईझिन फालेरो यांना कोरोनाची लागण
तृणमूल काँग्रेसचे खासदार लुईझिन फालेरो व डेरेक ओब्रियान हे दोघेही कोरोना बाधित झाले असून त्यांनी विलगिकरणात राहुन डॉक्टर्स सल्ल्यानुसार उपचार सुरु केले असल्याची माहिती दिली आहे. शिवाय गेले दोन – तीन दिवस संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दाबोळी विमानतळावर 5 प्रवासी कोरोनाबाधित
युके व शारजा येथून गोव्यात आलेल्या अनुक्रमे 4 व 1 असे मिळून एकूण 5 प्रवासी कोरोनाबाधित सापडले आहेत. दाबोळी विमानतळावर त्यांची कोरोना चाचणी केली तेव्हा ते कोरोनाचे रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना विलगिकरणात ठेवण्यात आले असून मार्गदर्शक तत्वांनुसार त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली आहे. त्यांचे नमुने ओमायक्रॉन चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा असल्याचे ते म्हणाले.









