पदाधिकाऱयांच्या केबीनला शुक्रवारीच सायंकाळी लागला टाळा
प्रतिनिधी/ सातारा
पालिकेच्या विद्यमान पदाधिकाऱयांची मुदत दि. 24 रोजी संपली असून त्याच दिवशी सायंकाळी प्रशासनाने त्यांच्या केबीनला लॉक लावण्यात आले असून सोमवारी प्रशासक कोण बसणार याकडे सगळय़ांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. दरम्यान, सायंकाळी उशीरापर्यंत कोणताही अद्यादेश निघाला नव्हता. मुदत संपल्याने सोमवारी एकदोन पदाधिकारी पालिकेत आले परंतु ते बाहेरुनच गेले. प्रारुप आराखडय़ाकडे नजरा सगळय़ांच्या लागून राहिल्या असून कच्च्या नकाशावर अनेक इच्छूक आहेत. वॉर्डावॉर्डात हा आमचा वॉर्ड तो तुमचा वॉर्ड अशीच चर्चा सुरु आहे.
पालिकेच्या विद्यमान पदाधिकाऱयांची मुदत दि. 24 डिसेंबरला संपली आहे. पालिकेच्या पदाधिकाऱयांनी शुक्रवारीच आपल्या पदाचा शेवटचा दिवस घालवला. सांयकाळी उशीरा पदाधिकाऱयांच्या केबीनला प्रशासनाकडून कुलूपे लावण्यात आली. नगराध्यक्षांनीही आपली गाडी जमा केली. दरम्यान, सोमवारी पालिकेत प्रशासक कोण येणार याकडे नजरा लागून राहिल्या होत्या. प्रांताधिकारी की मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडे पदभार येणार याकडे सातारकरांच्या नजरा लागून राहिल्या असून सायंकाळी उशीरापर्यंत राज्याच्या नगरविकास विभागाकडून तसे कोणतेही परिपत्रक आले नव्हते. दरम्यान, प्रारुप आराखडय़ाचा जुना कच्चा नकाशा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. त्याच नकाशावर अनेक इच्छूक आपला हा वॉर्ड आपला तो वॉर्ड. हा भाग आपल्याकडे आलेला आहे. मतदार आपल्यालाच मतदान करणार अशी प्रत्येक वॉर्डात चर्चा रंगत आहे.
मुख्याधिकारी की प्रांत?
सातारा पालिकेत विद्यमान पदाधिकाऱयांचा कार्यभार संपल्यानंतर पालिकेवर प्रशासक म्हणून मुख्याधिकारी अभिजीत बापट हे यावेत, अशी साताऱयातील अनेकांची इच्छा आहे तर शासनाच्या अद्यादेशात नेमके काय असणार आहे याचीच उत्सुकता लागून राहिली आहे.








