प्रतिनिधी/ सातारा
आयुष्यात त्याच गोष्टी करा, ज्या तुम्हाला करण्यास योग्य वाटतात. जन्माला आल्यावर तुम्हाला एकटय़ाने संघर्ष करून पुढे वाटचाल करायची असते. आपणच आपला आरसा असतो. असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करून खडतर प्रवास करत जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक प्रियांका मारुती संकपाळ यांनी देशाच्या नावलैकिकात भर टाकली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, दिल्ली येथे घेण्यात आलेल्या ऑल इंडिया बोर्ड ऑफ एक्झामिनेशन फॉर फिंगरप्रिट एक्सपर्ट या परीक्षेत सातारा जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका मारुती संकपाळ यांनी देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
पोउपनि प्रियांका संकपाळ यांचे मुळ गाव कोल्हापूर आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण कौतुक विद्यालय शिरोली येथून घेतले. माध्यमिक शिक्षण डॉ. डी. वाय. पाटील ज्युनियर कॉलेज कोल्हापूर येथे पूर्ण केले. विवेकांनद कॉलेजमधून बीएसी. स्टॅटस्टीक, छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठातून त्यांनी बॅचलर इन जर्नालिझम ऍण्ड मास कम्युनिकेशन हा कोर्स पूर्ण केला. पोउपनि प्रियांका यांच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले. यामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आई दुर्गा मारुती संकपाळ यांच्या खाद्यांवर येऊन पडली. प्रियांका या एकत्र कुटुंब पद्धतीत मोठय़ा झाल्या आहेत. त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होत्या. त्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले. 21 नोव्हेंबर 2019 रोजी प्रियांका यांची जिल्हा पोलीस दलात सातारा फिंगर प्रिंट विभागात पोलीस उपनिरीक्षकपदी पहिली पोस्टींग झाली. परंतु या पदावर काम करताना त्या आणखी पुढे जाण्याच्या संधी शोधत होत्या. ती संधी त्यांना ऑल इंडिया बोर्ड ऑफ एक्झामिनेशन फॉर फिंगरप्रिट एक्सपर्ट या परिक्षेमार्फत मिळाली. पोलीस उपनिरीक्षक पदी रूजु झाल्यानंतर तीन वर्षांनी त्यांना फिंगरप्रिट एक्सपर्ट म्हणून पात्र ठरवण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते.
इंग्रजी, हिंदीचे ज्ञान कमी असताना…
फिंगरप्रिट एक्सपर्ट ही परीक्षा इंग्रजी किंवा हिंदीमधून घेतली जाते. इंग्रजीचे ज्ञान कमी असतानाही या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवायचा असा निश्चय पोउपनि प्रियांका यांनी केला. त्यानी या परीक्षेसाठी योग्य अशी मार्गदर्शन पुस्तके घेतली. या पुस्तकानुसार अभ्यास करून परीक्षेला सामोरे गेल्या. इतर राज्यातून येणाऱया मुलांच्या तुलनेत आपण कमी आहोत असा प्रश्न त्यांनी मनात उपस्थित न करता प्रयत्नांच्या जोरावर यश मिळवले.









