संततधारेमुळे लढतीत व्यत्यय, विराटसेनेला उर्वरित 3 दिवसात नव्याने रणनीती आखण्याची गरज
सेंच्युरियन / वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱया दिवशी संततधार पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही आणि यामुळे या लढतीची समीकरणे आता बरीच बदललेली असणार आहेत. पहिल्या दिवसअखेर भारताने 3 बाद 272 धावा केल्या असून सामना जिंकण्याच्या दिशेने विराटसेनेने रणनीती आखणे अपेक्षित आहे.
सोमवारी सामन्याच्या दुसऱया दिवशी सकाळी संततधार असल्याने खेळाला वेळेवर सुरुवात होणे कठीण असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दिवसभरात पाऊस थांबल्याने पंचांनी दोनवेळा खेळपट्टीची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. पण, दोन्ही वेळा त्यापूर्वीच पुन्हा संततधारेला सुरुवात झाली. नंतर बीसीसीआयने आपल्या ट्वीटर हँडलवरुन दुसऱया दिवसाचा खेळ रद्द केला गेला असल्याची माहिती दिली.
सोमवारी खेळपट्टीवर आच्छादित कव्हरवर बरेच पाणी साचले आणि दिवसभरात अजिबात सूर्यदर्शन झाले नाही. त्यात सातत्याने संततधार सुरु राहिल्याने खेळपट्टी सुकण्याची अजिबात शक्यता नव्हती.
भारताने या लढतीत पहिल्या दिवशी 3 बाद 272 या धावसंख्येपर्यंत मजल मारली, त्यावेळी केएल राहुल 248 चेंडूत 122 धावांवर तर अजिंक्य रहाणे 81 चेंडूत 40 धावांवर खेळत होते. शतकवीर केएल राहुलच्या खेळीत 17 चौकार व 1 षटकाराचा समावेश राहिला. रहाणेने 40 धावांच्या खेळीत 8 चौकार फटकावले.
सलामीवीर मयांक अगरवालने 123 चेंडूत 60 धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेतर्फे लुंगी एन्गिडीने तिन्ही बळी टिपले. कर्णधार विराट कोहली 94 चेंडूत 35 धावांवर बाद झाला. आता फक्त 3 दिवसांचा खेळ बाकी राहिला असल्याने भारताने आणखी एक दिवस पूर्ण खेळत 400 ते 450 धावांची मजल गाठली तर दक्षिण आफ्रिकेवर उत्तम दडपण आणता येईल, हे स्पष्ट आहे. आफ्रिकन संघात सध्या कर्णधार डीन एल्गार, अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज क्विन्टॉन डी कॉक व तेम्बा बवूमा असे तीनच अनुभवी खेळाडू आहेत. जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज यांच्या अव्वल माऱयाला सामोरे जाताना त्यांची कसोटी लागली तर यात आश्चर्याचे कारण नसेल.
अर्थात, 20 बळी घेण्यासाठी उर्वरित 3 दिवसात पूर्ण खेळ होणे देखील तितकेच महत्त्वाचे असणार आहे. तिसऱया व चौथ्या दिवशी ढगाळ वातावरण असेल. मात्र, पावसाचा व्यत्यय अपेक्षित नाही. पाचव्या दिवशी मात्र किंचीत संततधार होईल, असा स्थानिक हवामान खात्याचा होरा आहे.









