अपहरणकर्त्यांशी लावून दिला विवाह
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानात पुन्हा एकदा हिंदू धर्मीयांवरील अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. सिंध प्रांतात एका अल्पवयीनासह दोन हिंदू मुलींचे अपहरण करत त्यांचे बळजबरीने धर्मांतर करण्यात आले. त्यानंतर अपहरण करणाऱयांमधील दोघांशी या मुलींचा बळजबरीने विवाह लावून देण्यात आला. यातील एका हिंदू मुलीचे वय केवळ 13 वर्षे आहे. तर दुसऱया मुलीचे वय 19 वर्षे आहे.
सिंध प्रांतातील मीरपूर खास जिल्हय़ातील अल्पवयीन मुलगी रोशनी मेघवारचे अपहरण करण्यात आले. तिच्यावर धर्मांतराची बळजबरी करत तिच्या वयापेक्षा दुप्पट वयाच्या व्यक्तीसोबत तिचा विवाह लावून देण्यात आला. पाकिस्तानचे खासदार आणि देशातील अल्पसंख्याक नेते लालचंद मल्ही यांनी पीडितेची व्यथा जगासमोर आणली आहे.
अल्पसंख्याकांवरील अत्याचार आणि त्यांचे बळजबरीने धर्मांतर रोखण्यास अपयशी ठरलेल्या सत्तारुढ इम्रान खान सरकारवर त्यांनी कडाडून टीका केली आहे. रोशनी मेघवारचा विवाह थारपारकरचा रहिवासी आणि अपहरणकर्ता मोहम्मद मूसासोबत लावून देण्यात आला. तर रोशनीचे नाव बदलून रजिया करण्यात आले. या मुलीचे अनेक महिन्यांपूर्वी अपहरण करत तिला कैदेत ठेवण्यात आले होते. तर 19 वर्षीय हरियान मेघवारचे अपहरण केल्यावर तिचा विवाह भाई खानसोबत लावून देण्यात आला. भाई खान हा 31 वर्षीय असून पूर्वीपासून विवाहित आहे.








