मंगळवारपासून अंमलबजावणी: मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहेत. सध्या ओमिक्रॉनच्या 37 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा नाईट कर्फ्यू जारी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवार दि. 28 डिसेंबरपासून 10 दिवस राज्यभरात रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत नाईट कर्फ्यू जारी केला आहे. त्यामुळे नवीन वर्ष साजरे करण्यावर निर्बंध आले आहेत.
राज्यात वाढत असलेल्या ओमिक्रॉनवर नियंत्रण आणण्याबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्त्वाखाली बेंगळूरमधील मुख्यमंत्र्यांचे गृहकार्यालय ‘कृष्णा’ येथे कोविड टास्कफोर्समधील तज्ञ आणि मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीत संसर्ग रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू, सार्वजनिक ठिकाणी नवीन वर्ष साजरे करण्यावर निर्बंध, हॉटेल, पब, बार आणि कार्यक्रमांमध्ये 50 टक्के नागरिकांना प्रवेश देण्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
राज्य सरकारच्या या निर्णयांमुळे सार्वजनिक ठिकाणी नवीन वर्ष साजरे करू नये. कोणत्याही क्लब, पब, हॉटेल, सार्वजनिक ठिकाणी नवीन वर्षानिमित्त विशेष पाटर्य़ा, ऑर्प्रेस्ट्रा, डीजेवर निर्बंध घालण्याची नवी मार्गसूची जारी केली आहे. याचबरोबर नाईट कर्फ्यूही जारी केला असल्याने या सर्वांवर निर्बंध आले आहेत. नाईट कर्फ्यू जारी करण्यात आल्याने 28 डिसेंबरपासून रात्री 10 नंतर हॉटेल, पब, बार, क्लबसह सर्व पद्धतीचे व्यावसायिक उपक्रम बंद होणार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले, राज्यात ओमिक्रॉन संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी येत्या 28 डिसेंबरपासून 10 दिवस रात्री 10 पासून पहाटे 5 पर्यंत नाईट कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. रविवारच्या बैठकीत देश आणि राज्यात वाढत असलेले ओमिक्रॉनचे रुग्ण, कोरोना संसर्गाची परिस्थिती, ओमिक्रॉनवर नियंत्रण आणण्यासाठी हाती घ्याव्या लागणाऱया उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात येऊन राज्यात नाईट कर्फ्यू जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी कोविड तांत्रिक सल्ला समितीचे सदस्य, तज्ञ, महसूलमंत्री आर. अशोक, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, राज्य सरकारचे मुख्य कार्यदर्शी पी. रविकुमार यांच्यासह ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मार्गसूची…
28 डिसेंबरपासून 7 जानेवारी 2022 पर्यंत रात्री 10 पासून सकाळी 5 पर्यंत नाईट कर्फ्यू
10 दिवस रात्री 10 नंतर हॉटेल, पब, बार होणार बंद
30 डिसेंबरपासून 2 जानेवारीपर्यंत सर्व हॉटेल, क्लब, पब, रेस्टॉरंटमध्ये 50 टक्के नागरिकांना प्रवेश
सर्व हॉटेल कर्मचाऱयांना आरटीपीसीआर निगेटिव्ह चाचणी बंधनकारक, दोन्ही डोस घेणे आवश्यक
लग्नासह इतर कार्यक्रमांमध्ये 300 नागरिकांना मुभा
महाराष्ट्र, केरळ सीमाभागात खबरदारी आणि गस्त