इतिहासातील कचऱयाच्या डब्यात पाठवू
वृत्तसंस्था/ बीजिंग
तैवानला प्रतिनिधी कार्यालय सुरू करण्याची अनुमती दिल्याप्रकरणी युरोपमधील छोटय़ा आकाराचा देश लिथुआनियाला चीनने धमकाविले आहे. ‘इतिहासातील कचऱयाच्या डब्यात पाठविण्याची’ धमकी चीनकडून देण्यात आली आहे. चीन हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश आहे. तर लिथुआनियाची लोकसंख्या केवळ 30 लाख आहे. लिथुआनियाने तैवानला मान्यता दिल्याने चीनचा जळफळाट झाला आहे.
तैवानला स्वतःच्या नावाने एक कार्यालय सुरू करण्याची अनुमती देणार असल्याचे लिथुआनियाने ऑगस्ट महिन्यात जाहीर केले होते. या घोषणेनंतर चीनने लिथुआनियामधून स्वतःचा राजदूत परत बोलाविला होता. तसेच लिथुआनियासोबतचे राजनयिक संबंध कमी केले होते.
लिथुआनिया सार्वभौमिक तत्वांच्या दुसऱया बाजूला उभा आहे, याचा अंत कधीच सुखद होणार नसल्याचे चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिन यांनी म्हटले आहे.
तैवानच्या विघटनवादी शक्तींसोबत मिळून काम करण्यावर भर देणाऱया लोकांना इतिहासाच्या कचऱयाच्या डब्यात पाठविले जाणार असल्याची धमकी झाओ यांनी दिली आहे. लिथुआनिया जागतिक महासत्तांपैकी एक असलेल्या चीनला आव्हान देत आहे. दोन्ही देशांदरम्यान राजनयिक संबंध आता बिघडले आहेत. चीन आणि लिथुआनियाचे नेते वाप्युद्धात परस्परांशी स्पर्धा करत आहेत.
चीनच्या धमक्यांची पर्वा न करता लिथुआनियाच्या एका खासदाराने काही दिवसांपूर्वी चीनला ‘पीपल्स लिबरेशन ऑफ कॉमेडी’ ठरविले होते. या खासदाराने तैवानच्या दौऱयावर गेलेल्या अधिकृत शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते हे विशेष. तर लिथुआनियाने चिनी अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी महत्त्वाकांक्षी मोहीम ‘सीईईसी’ सोडण्याची घोषणा केली होती. या फोरमची स्थापना चीनने 2012 मध्ये केली होती आणि यात युरोपचे 17 देश सामील आहेत.









