लुधियाना
पंजाबमधील लुधियाना न्यायालयात गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव माजी पोलीस कर्मचारी गगनदीप सिंग (30) असे आहे. तपासादरम्यान सुरक्षा यंत्रणांना ढिगाऱयात सापडलेल्या मोबाईल सिम आणि डोंगलच्या क्रमांकावरून त्याची ओळख पटली आहे. 2019 मध्ये ड्रग्ज माफियांशी संबंध असल्याने त्याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. दोन वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर 8 सप्टेंबर रोजी त्याची तुरुंगातून सुटका झाली होती.
मृत गगनदीप सिंग हा जीटीबी नगर खन्ना येथील रहिवासी आहे. त्याच्या वडिलांचे नाव अमरजित सिंग आहे. गगनदीप सिंगला एसटीएफने ऑगस्ट 2019 मध्ये 85 ग्रॅम हेरॉईनसह अटक केली होती. तो एका महिलेच्या साथीने ड्रग्जची तस्करी करत होता. तो लुधियाना जिल्हय़ातील खन्ना सदर पोलीस ठाण्यात यापूर्वी तैनात होता.









