वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात प्रतिष्ठेची समजली जाणारी 75 वी संतोष करंडक वरिष्ठ पुरुषांची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा केरळमध्ये 20 फेब्रुवारी ते 6 मार्च दरम्यान खेळविली जाणार आहे. या स्पर्धेतील अंतिमफेरीसाठी पात्र ठरलेल्या 10 संघांच्या सहभागाच्या अंतिम स्पर्धेचे यजमानपद केरळ भूषविणार आहे.
भारतीय फुटबॉल क्षेत्राच्या स्पर्धा कार्यक्रमामध्ये प्रत्येक वर्षी संतोष करंडक फुटबॉल स्पर्धा महत्त्वाची समजली जाते. या स्पर्धेला 75 वर्षे पूर्ण झाली असून अमृतमहोत्सवी ही स्पर्धा मोठय़ा प्रमाणात यशस्वी करण्यासाठी केरळचे शासन सज्ज झाले आहे, अशी माहिती अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे सरचिटणीस कुशल दास यांनी सांगितले. अमृतमहोत्सवी संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेचा ड्रॉ 2022 च्या जानेवारीतील पहिल्या आठवडय़ात काढला जाणार आहे. केरळमध्ये फुटबॉलचा विकास झपाटय़ाने होत असल्याचे चित्र पहावयास मिळत असून येथे महिलांची वरिष्ठ राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा नुकतीच मोठय़ा प्रमाणात पार पडली. 75 व्या संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेत उत्तर विभागातील सेनादल आणि पंजाब तसेच उत्तर -पूर्व विभागातील मेघालय आणि मणीपूर, दक्षिण विभागातील कर्नाटक आणि यजमान केरळ, पश्चिम विभागातील गुजरात व राजस्थान त्याचप्रमाणे पूर्व विभागातील ओडिशा आणि प.बंगाल यांचा समावेश राहील.









