हॉस्टेल-वसतीशाळा नोकर संघाची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
शासकीय वसतिगृह, निवासी शाळा आणि आश्रम शाळेत सेवा बजावणाऱया कर्मचाऱयांचा ड वर्ग श्रेणीमध्ये समावेश करावा, अशी मागणी कर्नाटक राज्य सरकारी हॉस्टेल आणि वसतीशाळा नोकर संघाने गुरुवारी विधानसौधसमोर आंदोलनाद्वारे केली.
राज्यातील समाज कल्याण विभाग, मागासवर्गीय कल्याण आणि अल्पसंख्याक विभागांतर्गत पदवीपूर्व कॉलेज, आश्रमशाळा आणि निवासी शाळांमध्ये काम करणाऱया कर्मचाऱयांचा ड वर्ग श्रेणीमध्ये समावेश करावा. मागील दहा वर्षांपासून सेवा बजावणाऱया कर्मचाऱयांकडे दुर्लक्ष झाले आहे. दरम्यान, काही महिन्यांचे वेतनही मिळाले नाही. लॉकडाऊन काळात इतर राज्यातील कर्मचाऱयांना वेतन मिळाले असले तरी राज्यातील कर्मचाऱयांना वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे कर्मचाऱयांचे कुटुंबीय अडचणीत आली आहेत. गुलबर्गा, बेळगाव, मंगळूर, शिमोगा, तुमकूर, म्हैसूर, हासन व इतर ठिकाणी असलेल्या वसतिगृह, निवासी शाळा आणि आश्रम शाळांतून कर्मचारी सेवा बजावतात. मात्र, कर्मचाऱयांना वेळेत वेतन दिले जात नाही. त्यामुळे कुटुंबीय आर्थिकदृष्टय़ा अडचणीत आली आहेत. कर्मचाऱयांचा ड वर्ग श्रेणीत समावेश करून निवृत्तीपर्यंत सेवेत कायम करावे, अशी मागणी कर्नाटक राज्य सरकारी हॉस्टेल आणि वसतीशाळा नोकर संघाने निवेदनाद्वारे केली आहे.









