मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचा इशारा : गोवा राज्य सहकार पुरस्कारांचे वितरण : ऍड.विनायक नार्वेकरांना सहकार रत्न : दीनदयाल मल्टिपर्पज सर्वोत्कृष्ट सहकारी संस्था
प्रतिनिधी /फोंडा
सहकार क्षेत्र हे विश्वासावर चालते. काही कर्जबुडव्या लोकांमुळे व स्वार्थी संचालकांमुळे पतसंस्था डबघाईला आल्या आहेत. एखादी पतसंस्था बुडाल्यास त्याचा दोष मात्र सरकारवर येतो. नवीन सहकार कायद्यामुळे यापुढे अशा गैरकृत्यांना वेसण घालता येईल. प्रत्येक संस्था व संचालक मंडळांना नियमांपलिकडे कर्ज देताना विचार करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. सहकार खात्यातर्फे आयोजित केलेल्या गोवा राज्य सहकार पुरस्कार वितरण सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरमध्ये काल मंगळवारी सकाळी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. सन् 2020-21 सालासाठी सर्वोत्कृष्ट सहकारी संस्था म्हणून दीनदयाल मल्टिपर्पज कॉ. सोसायटीला तर सहकार क्षेत्रातील सर्वोच्च ‘सहकार रत्न’ हा पुरस्कार ऍड. विनायक नार्वेकर यांना प्रदान करण्यात आला. सन् 2019 सालचा सर्वोत्कृष्ट सहकारी संस्थेसाठी दी शिरोडा प्रोग्रेसिव्ह अर्बन सहकारी संस्थेला तर ‘सहकार रत्न’ पुरस्कार प्रकाश वेळीप यांना देण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर सहकारमंत्री गोविंद गावडे, सहकार खात्याचे सचिव चोखाराम गर्ग, फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर व सहकार निबंधक अरविंद खुटकर हे उपस्थित होते.
स्वयंसाहाय्य गटांची आता आरडीएकडे नोंदणी होणार
राज्यात 5203 सहकारी संस्था असून साधारण 14 लाख भागधारक आहेत व या क्षेत्रातील एकूण गुंतवणूक 10 हजार कोटी एवढी आहे. राज्याच्या समांतर विकासाचे हे क्षेत्र असून त्यात विश्वासाहर्ता महत्त्वाची आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले. राज्यातील महिला स्वयंसाहाय्य गट यापुढे ग्रामीण विकास प्राधिकरणच्या म्हणजेच आरडीएच्या अधिकारक्षेत्रात नोंद करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. राज्यात 1418 स्वयंसाहाय्य गट असून आरडीएच्या माध्यमातून त्यांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनआधार योजनेअंतर्गत रु. 1 लाख 30 हजारपर्यंत लघुउद्योगासाठी कर्ज मिळू शकते. सहकार खात्यात हे गट राहिल्यास त्यांची योग्य प्रगती होणार नाही. आरडीएच्या माध्यमातूनच स्वयंसाहाय्य गटाच्या विकासाला खरी दिशा मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
सहकार क्षेत्रात रोजगारांच्या अनेक संधी : गोविंद गावडे
मंत्री गोविंद गावडे म्हणाले, सहकार क्षेत्रात लोकांचा मोठय़ा प्रमाणात सहभाग आवश्यक असून युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या अनेक संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत. कर्जदारांनी ठेविदारांच्या घामा कष्टाच्या पैशांचा विचार करून वेळोवेळी कर्ज फेडण्याचे आवाहन त्यांनी केले. अरविंद खुटकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
सन् 2020-21 सालचा गोवा ‘सहकार भूषण’ पुरस्कार विठ्ठल साजी वेर्णेकर यांना तर गोवा ‘सहकार श्री’ पुरस्कार सुभाष हळर्णकर यांना प्रदान करण्यात आला. वैयक्तिक पुरस्कार बाणावली दूध उत्पादक संस्थेच्या फ्लोरी फारिया यांना व आगोंद काणकोण येथील आगोंदेश्वर दूध उत्पादक संस्थेचे शिवाजी नाईक गावकर यांना देण्यात आला. 2019-20 सालचा गोवा ‘सहकार भूषण’ पुरस्कार उमेश शिरोडकर यांना तर गोवा ‘सहकार श्री’ पुरस्कार श्रीकांत नाईक यांना देण्यात आला. याशिवाय 2019-20 सालचा वैयक्तिक पुरस्कार नमसवाडा कुंकळय़े म्हार्दोळ येथील देवानंद विजया सहकारी दूध पतसंस्थेच्या सुलभा भास्कर जल्मी व आडपई दुर्भाट येथील श्री रवळनाथ वि. का. स. सेवा सोसायटीचे चंद्रकांत बाबल गावडे यांना देण्यात आला.
2019-20 सालचा प्रोत्साहन पुरस्कार दी बिचोलीम सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेला तसेच मडगाव शाळा समुह सहकारी पतसंस्थेला देण्यात आला. म्हार्दोळ येथील दी महालसा अर्बन सहकारी पतसंस्थेला विशेष प्रोत्साहन पुरस्कार बहाल करण्यात आला.
सन् 2020-21 सालचा उत्कृष्ट सहकारी संस्थेचा पुरस्कार दी गोवा शिपयार्ड कर्मचारी सहकारी पतसंस्थेला, दी सहकारी खाते कर्मचारी सहकारी पतसंस्थेला व दी ऍपेक्स बँक कर्मचारी सहकारी पतसंस्थेला विशेष प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आले.









