अन्यथा आज कार्यालयावर घागर मोर्चा : ग्रामस्थांचा इशारा : सहा दिवसांपासून पाणी समस्या
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयातील गुळेली पंचायत क्षेत्रातील मुरमुणे गावांमध्ये गेल्या सहा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. जलवाहिनी बिघडल्यामुळे ती दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याची यंत्रणा निष्काळजीपणा करीत आहे. यामुळे या गावातील 70 घरांसाठी पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी पाठविण्यात येणारा टँकर कमी पडू लागला आहे. यामुळे संतप्त बनलेल्या ग्रामस्थांनी काल वाळपईच्या पाणीपुरवठा कार्यालयावर मोर्चा नेऊन आपला संताप व्यक्त केला. मंगळवारी रात्रीपर्यंत पाणीपुरवठा पूर्वपदावर न आल्यास बुधवारी वाळपई पाणीपुरवठा कार्यालयावर घागर मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे.
जलवाहिनीत बिघाड
गुळेली पंचायत क्षेत्रातील मुरमुणे या ठिकाणी 70 घरे आहेत. या घरांसाठी पैकुळ पाणी प्रकल्पाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र गेल्या सहा दिवसापूर्वी पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिनीतून बिघाड झाला आहे. सदर जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झालेला आहे. यामुळे नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भाच्या तक्रारी अनेकवेळा करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
अधिकाऱयांकडून असहकार्य : रोहिदास गावकर
अनेकवेळा या संदर्भात तक्रारी करण्यात आल्या. मात्र त्याकडे अजूनपर्यंत लक्ष देण्यात आलेले नाही. कार्यालयातील अधिकाऱयांशी अनेकवेळा फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित अधिकारी सहकार्य करीत नाहीत, असा आरोप माजी सरपंच यावेळी रोहिदास गावकर यांनी केला.
दोन दिवसआड एक टँकर पाणी
रोहिदास गावकर म्हणाले की, दर दोन दिवसांनी 70 घरांसाठी एक टँकर पाठविण्यात येत आहे. मात्र सदर पाणी पुरवठा कमी पडत असल्यामुळे ग्रामस्थांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रत्येक घरासाठी फक्त चार भांडय़ातून पाणी भरून घ्यावे लागते. सरकारने प्रत्येक महिन्यासाठी 16000 लिटर पाणी मोफत देण्याची घोषणा केली. मात्र मुरमुणे सारख्या गावांमध्ये दोन दिवसात फक्त पन्नास लिटर पाणी उपलब्ध होत असते. यामुळे सरकारची घोषणा हास्यास्पद असल्याचा आरोप गावकर यांनी केला. यामुळे बुधवारी संध्याकाळपर्यंत जलवाहिनीची दुरुस्ती करून पाणी सुविधा उपलब्ध न झाल्यास बुधवारी गावातील ग्रामस्थ महिलांसमवेत घागर मोर्चा काढणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
11.30 वा.पर्यंत अधिकाऱयांचा पत्ताच नाही
दरम्यान, सदर गावातील ग्रामस्थ सकाळी दहा वाजता कार्यालयात पोहोचले होते, मात्र 11.30 वाजेपर्यंत या कार्यालयातील अधिकारीवर्ग गायब असल्याचे पहावयास मिळाले. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सरकारने या कार्यालयातील अधिकाऱयावर नजर ठेवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. 11.30 वाजेपर्यंत कर्मचारी कार्यालयात न येणे ही खरोखरच जनतेची गैरसोय असून यासंदर्भात पाणीपुरवठा कार्यालयाच्या मंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गांभीर्याने लक्ष घालणार : सोमा नाईक
दरम्यान, कार्यालयाचे साहाय्यक अभियंता सोमा नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सदर भागातील पाणीपुरवठा संदर्भात गांभीर्याने लक्ष देण्यात येणार आहे. आपण पणजी येथील प्रधान कार्यालयात एका महत्त्वाच्या कामानिमित्त व्यस्त असल्यामुळे वाळपई कार्यालयात पोहोचू शकलो नाही असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी संबंधित प्रतिनिधीशी बोलताना दिले.









