प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे शिष्टमंडळ आज बुधवारी केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांची भेट घेणार आहे. राजधानी नवी दिल्लीत कायदा मंत्रालयात सायंकाळी चार वाजता ही भेट होणार आहे. कोल्हापूर जिल्हा बार असोशिएशनचे अध्यक्ष ऍड. गिरीष खडके यांनी ही माहिती दिली.
केंद्रीय अवजड उद्योगमंत्री नारायण राणे दोन आठवडÎापूर्वी कोल्हापूर दौऱयावर आले होते. यावेळी खंडपीठ कृती समिती आणि केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरेन रिजिजू यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. मंत्री राणे यांच्या पुढाकाराने या भेटीची तारीख बुधवार 22 डिसेंबर ठरली. त्यानुसार खंडपीठ कृती समितीचे शिष्टमंडळ नवी दिल्लाला रवाना झाले. या शिष्टमंडळात कोल्हापूर जिल्हा बार असोशिएशनचे अध्यक्ष ऍड. गिरीष खडके, सचिव ऍड. विजयकुमार ताटे-देशमुख, सिंधुदुर्गचे ऍड. संग्राम देसाई, साताराचे ऍड. वसंतराव भोसले आणि कोल्हापूरचे ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. महादेवराव आडगुळे, ऍड. संतोष शहा यांचा समावेश आहे.
कोल्हापूरमध्ये खंडपीठाची आवश्यकता का आहे ?, कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी कोल्हापूर हे ठिकाण कसे योग्य आहे?, सहा जिह्यातून गेली तीन चार दशके खंडपीठाची मागणी कशी जोर धरून आहे?, या मागणीसाठी आजवर झालेली आंदोलने, राज्य शासन, उच्च न्यायालयाच्या स्तरावर करण्यात आलेला पाठपुरावा या संदर्भात केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांना माहिती दिली जाणार आहे, त्याचबरोबर केंद्रीय स्तरावरून कायदा मंत्रालयाने खंडपीठ मागणीला पाठबळ द्यावे, अशी मागणीही मंत्री रिजिजू यांच्याकडे केली जाणार असल्याचे अध्यक्ष गिरीष खडके यांनी सांगितले.