बेंगळूर सेंट्रल विभागाचे डीसीपी एम. एन. अनुचेत यांची माहिती : आणखी काहींचा शोध सुरू
प्रतिनिधी /बेंगळूर
बेंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची विटंबना केल्याप्रकरणी कर्नाटक रणधीर पथकाचे अध्यक्ष चेतनगौडा याच्यासह सात जणांना सदाशिवनगर पोलिसांनी अटक केली आहे. रणधीर पथकाचे अध्यक्ष चेतनगौडा याच्यासह माजी आमदार टी. नारायणकुमार यांचा पुत्र, अखिल कर्नाटक कन्नड चळवळ केंद्र समितीचा कार्याध्यक्ष गुरुदेव नारायणकुमार, वरुण, नवीनगौडा, विनोद, चेतनकुमार आणि योगेश यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती बेंगळूर सेंट्रल विभागाचे डीसीपी एम. एन. अनुचेत यांनी दिली.
या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश आहे. त्यामुळे आता अटक केलेल्या आरोपींकडून त्यांची माहिती घेऊन त्यांनाही अटक केली जाईल. महाराष्ट्रात लाल-पिवळय़ा झेंडय़ाला आग लावल्यानंतर 17 डिसेंबर रोजी मध्यरात्री चेतनगौडा याच्यासह इतरांनी बेंगळूरच्या सदाशिवनगर येथील सँकी रोडवरच्या भाष्यम सर्कलमधील शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळय़ावर शाई ओतून विटंबना केली होती. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सीमाभागासह महाराष्ट्रात निषेध नोंदविण्यात आला आहे.
सदर कृत्य करण्यासाठी या आरोपींकडून चार दिवसांपूर्वी कट रचण्यात आला होता, असे डीसीपी एम. एन. अनुचेत यांनी स्पष्ट केले. तसेच 14 डिसेंबरपासून दोन दिवस सँकी रोडवरील कालव्याजवळ त्यांनी पाहणी केली होती. दरम्यान, 15 रोजी पुन्हा आल्यानंतर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्यांना घरी पाठवले होते. उंच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ापर्यंत पोहोचण्यासाठी आरोपींनी शिडीही आणून ठेवली होती.
त्यानुसार 16 डिसेंबर रोजी मध्यरात्री कार, दोन रिक्षा आणि एका दुचाकीवरून आलेल्या 15 जणांनी हे कृत्य केले आहे. विनोदने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळय़ावर शाई ओतून विटंबना केली आहे. तर नवीनगौडा याने या कृत्याचा व्हिडिओ करून सोशल मिडियावर व्हायरल केला आहे, असे समजते. या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असून ते फरारी आहेत. त्यांचा शोध घेण्याचे कार्य निरंतर सुरू आहे, असे डीसीपी एम. एन. अनुचेत यांनी सांगितले.
काही समाजकंटकांकडून समाज स्वास्थ्य बिघडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संगोळ्ळी रायण्णा हे देशासाठी लढलेले महान व्यक्ती आहेत. त्यामुळे चुका केलेल्यांविरूद्ध कारवाई केली जात आहे, असेही ते म्हणाले.
विशेष पथकांकडून कारवाई
दरम्यान, या घटनेनंतर बेंगळूरमधील शिवपुतळा परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुतळय़ाची विटंबना करणाऱया अज्ञातांविरुद्ध यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर आरोपींचा शोध घेण्यासाठी नेमलेल्या विशेष पथकाने आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यांच्यावर दोन गटांच्या भावना भडकविणे आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, बेंगळूरमध्ये सँकी रोड परिसरात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून जमावबंदीचा आदेश देण्यात आला आहे.









