सातारा / प्रतिनिधी :
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आमच्या दैवतांच्या पुतळय़ांचे रक्षण करता येत नसेल तर त्यांना मुख्यमंत्री म्हणून पदावर राहण्याचा अधिकार नाही. घडल्या प्रकाराबद्दल मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी लवकरात लवकर योग्य ती ऍक्शन घ्यावी अन्यथा कन्नडींगाना फोकळून काढले जाईल, अशा शब्दात शिवसेनेचे सातारा तालुका प्रमुख दत्ता नलावडे यांनी बोम्मई यांना इशारा दिला. दरम्यान, त्यांच्या प्रतिमेला जोडे मारुन निषेध नोंदवण्यात आला. त्यानंतर शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास दुग्धाभिषेक घालण्यात आला.
कर्नाटकात झालेल्या घटनेचे दुसऱया दिवशीही साताऱयात तीव्र पडसाद उमटले. शिवसेनेच्यावतीने साताऱ्यातल्या वाढे फाटा येथील चौकात कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या प्रतिमेला जोडे मारुन तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला. यावेळी बोलताना दत्ता नलावडे म्हणाले, अखंड हिंदूस्थानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज या आमच्या दैवताबाबत चुकीचे प्रकार कर्नाटकात होत असतील तर तेथील सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. आम्ही चुकीचे प्रकार खपवून घेणार नाही. संबंधित प्रकाराचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई न केल्यास कन्नडीगांना फोकळून काढू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दत्ता नलावडे, रमेश बोराटे, रवींद्र शेळके, गणेश अहिवळे, गणेश नलावडे आदी शिवसैनिक मोठय़ा संख्यने उपस्थित होते.









