ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
नोव्हावॅक्स ही लस कोरोना संसर्ग रोखण्यास 90 टक्के प्रभावी असल्याचे फेज 3 क्लिनिकल ट्रायलच्या निष्कर्षातून समोर आले आहे. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये यासंदर्भात अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.
नोव्हावॅक्सची फेज 3 मधील चाचणी नुकतीच पार पडली. त्यानुसार, कोणत्याही तिव्रतेच्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी ही लस 90 टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले. या चाचणीसाठी, मेरीलँड विद्यापीठाच्या टीमने यूएसमधील 113 क्लिनिकल साइट्स आणि मेक्सिकोमधील सहा साइट्सवर सुमारे 30,000 स्वयंसेवकांचा समावेश होता. 20,000 सहभागींना तीन आठवडय़ांच्या अंतराने लसीचे दोन डोस मिळाले आणि 10,000 जणांना प्लेसबॉस मिळाले. ही चाचणी 2021 च्या पहिल्या काही महिन्यांत घेण्यात आली होती. चाचणीदरम्यान, स्वयंसेवकांमध्ये इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना, डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि थकवा यासारखी लक्षणे दिसून आली.
दरम्यान, नोव्हावॅक्स या अमेरिकन औषधनिर्मात्या कंपनीने आपल्या लसीच्या उत्पादनासाठी पुणेस्थित सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियासोबतही करार केला आहे. भारतात ही लस कोव्होवॅक्स नावाने तयार करण्यात येत आहे. या लसीला नुकतीच जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये लसीकरणाची स्थिती सुधारण्यासाठी कोव्होवॅक्स लसीला परवानगी देण्यात आली आहे.