या नुकसानीला कुलगुरुच जबाबदार
कुपवाड / प्रतिनिधी
कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण विभागाच्या प्रथम वर्ष वर्गाच्या प्रवेशावर विद्यापीठ अनुदान आयोगाने बंदी घातल्याने हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. या गलथान कारभाराला सर्वस्वी विद्यापीठाचे कुलगुरुच जबाबदार आहेत. असा आरोप जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत केला.
याचा फटका महाविद्यालयात नियमितपणे प्रवेश न घेता बाह्य शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन याप्रकरणी कुलगुरुंची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, याबाबतची मागणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करणार असल्याचेही प्रा.शरद पाटील यांनी यावेळी सांगितले.